"नभ अंकुरले"कार तुळशीराम काजे काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 03:14 PM2018-09-10T15:14:01+5:302018-09-10T15:17:35+5:30
जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली. वर्षभरापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. तेव्हापासून ते अंथरूणावर खिळले होते. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांनी अमरावती येथील झेंडा चौकातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पुसनेर येथे जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
तुळशीराम माधवराव काजे यांचा जन्म १८ मार्च १९३२ रोजी पुसनेर या लहानशा खेडेगावात झाला. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून त्यांनी एम.ए. (मराठी), बी.एड.चे शिक्षण घेतले. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील लोणी येथे त्यांनी माध्यमिक शिक्षकाची नोकरी केली. दरम्यान काजे यांचा १९५८ साली नभ अंकुरले हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. दुसरा काव्यसंग्रह भ्रमिष्टाचे शोकगीत हा १९८३ मध्ये तर काहुरभैरवी तिसरा काव्यसंग्रह २००७ मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाने १९८४ साली तुळशीराम काजे यांना केशवसूत पुरस्काराने सन्मानित केले आहे. भ्रमिष्टाचे शोकगीत या काव्यसंग्रहाने त्यांचे नाव सर्वदूर प्रसिद्ध झाले. काजे यांनी १९५९ मध्ये धारा त्रैमासिकाचे प्रकाशन केले. मात्र, काही अडचणींमुळे ते फार काळ प्रसिद्ध करू शकले नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यासमंडळात १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी तज्ञ्ज म्हणून काम केले. अमरावती येथील मराठी जनसाहित्य परिषदेचे अध्यक्षपद सन १९९० ते २००२ पर्यंत त्यांनी भूषविले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे २००२ साली झालेल्या सातव्या मराठी जनसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरादेखील त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. लोकमत, अक्षर वैदर्भी आणि मौज' या दिवाळी अंकात काजे यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. काजे यांनी कसोशीने, ओंजळीतल्या दिव्याप्रमाणे कविता जपली. संपूर्ण आयुष्य त्यांनी कवितेला समर्पित केले.
काजे यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. साहित्य क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पुसनेर येथे धाव घेतली. त्यांच्या पश्र्चात पत्नी विमल, मानस मुलगी अलका उगले व नातू सुमित उगले आहेत.