श्वानाच्या छातीला ८७० ग्रॅमचा ट्युमर, वसा संस्थेत केली सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 12:06 AM2024-05-04T00:06:42+5:302024-05-04T00:07:08+5:30
प्राणिप्रेमी सुवर्णा देवघरे आणि विद्याप्रकाश चांडक यांच्या माहितीनुसार, सराफा बाजार परिसरातून वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू टीमने एका बेवारस मादी श्वानाला रेस्क्यू केले.
मनीष तसरे -
अमरावती : छातीला लटकलेल्या मांसाच्या गोळ्याने त्या मादी श्वानाला उठताही येत नव्हते आणि धडपणे बसताही येत नव्हते. तिच्या त्रासाने कळवळणाऱ्या प्राणिप्रेमींनी वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू हेल्पलाइनला कळविले. या संस्थेने चिकाटीने या मादी श्वानाला पकडून वसा ॲनिमल्स रेस्क्यू सेंटरला भरती करून घेतले. छातीला लटकलेल्या मांसाच्या गोळ्याचे वजन ८७० ग्रॅम होते. तो गोळा सर्जरी करून काढण्यात आला आहे.
प्राणिप्रेमी सुवर्णा देवघरे आणि विद्याप्रकाश चांडक यांच्या माहितीनुसार, सराफा बाजार परिसरातून वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू टीमने एका बेवारस मादी श्वानाला रेस्क्यू केले. पहिल्यांदा या श्वानाने हुलकावणी दिली. दुसऱ्यांदा टीम पूर्ण साहित्यनिशी सराफा बाजारात दाखल झाली आणि लगेच त्या मादी श्वानाला रेस्क्यू करत मंगलधाम परिसरातील श्री गोरक्षण व्हेटरनरी हॉस्पिटलला तपासणीसाठी दाखल केले. तेथे डॉ. सुमित वैद्य यांनी त्या मादी श्वानांची तपासणी करीत तिला वसा ॲनिमल्स रेस्क्यू सेंटरला भरती करून घेतले.
अडीच तासांची सर्जरी -
शुक्रवारी सर्व तपासण्या करत डॉ. वैद्य आणि सहायक पशुचिकित्सक शुभमनाथ सायंके यांनी तब्बल २ तास ४० मिनिटे तिची सर्जरी करीत छातीला असलेला ८७० ग्रॅमचा ट्युमर यशस्वीपणे काढला. या सर्जरीसाठी इलेक्ट्रॉक्वाटरी आणि गॅस अनेस्थेशिया मशीनचा वापर करण्यात आला.
‘दुधाच्या गाठीमुळे होऊ शकतो कॅन्सर’
बरेच वेळा लोक परिसरात जन्मलेल्या नवजात पिल्लांना पोत्यात भरून, बॉक्समध्ये बंद करून शहराबाहेर दूर नेऊन टाकतात. अशाने मादी श्वान कासावीस तर होतेच, शिवाय तिच्या शरीराचे दूध वापरले न गेल्याने छातीत गाठी निर्माण होतात. कालांतराने तिथे मस्टाइटिस्ट होतो किंवा ट्युमर तयार होतो. जास्त वाढ झालेला ट्युमर श्वानाला चालायला आणि बसायला त्रास देतो. जमिनीच्या संपर्कात आल्याने तो ट्युमर फुटू शकतो व त्यात इन्फेक्शन होऊन अळ्या पडू शकतात.