घरफोडीच्या गुन्ह्याचा बारा तासात छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:44+5:302021-03-14T04:13:44+5:30
अमरावती : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदुररेल्वे ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या बारा तासात छडा लावला. या प्रकरणात ...
अमरावती : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदुररेल्वे ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या बारा तासात छडा लावला. या प्रकरणात पोलिसांनी उमेश उत्तम गलबले (३२), मोहन बबन नागोसे (२९) व विजय श्यामराव भोयर (तिन्ही रा. चांदुरवाडी, ता. चांदुररेल्वे) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २ लाख १६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चांदुररेल्वे ठाण्यातील गुन्ह्याची कबुली
१२ मार्च रोजी चांदुरवाडीतील रहिवासी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया यांनी चांदुररेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. राजूसिंग चितोडिया ९ मार्च रोजी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह टेंभुर्णी गावी नातेवाइकांकडे गेले होते. १२ मार्च रोजी ते घरी परतले असता, त्यांना दाराच्या कुलुपांचा कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरातील साहित्यांची पाहणी केली असता, चोराने घरातून सोन्या-चांदीचे दागिने, कास्य धातुचे भांडे, सायकल व मुलाची इलेक्ट्रीक बाईक चोरी गेल्याचे आढळून आले होते. या घटनेच्या तक्रारीवरून चांदुररेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने चांदुररेल्वे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न करून तीन आरोपींना अटक केली. चौकशीनंतर आरोपींनी राजूसिंग चितोडिया यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.
बॉक्स
२ किलोच्या चांदीसह २ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक हरीबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, एएसआय मुलचंद भांबुरकर, पोलीस हवालदार बळवंत दाभणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, चालक संदीप नेहारे तसेच चांदुररेल्वे ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गणेश मोपळे, पोलीस हवालदार जगदिश राठोड यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दोन चांदीचे कडे, १ चांदीचा हार, एक चांदीचे फूल, एक केरी चांदीची वीट, दोन चांदीचे झुमके, दोन चांदीचे झुमकेवाले बटन अशी एकूण दोन किलो ४५० ग्रॅमची चांदी (१ लाख ४७ हजार) तसेच १० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, कास्य धातुचे १९ किलो भांडे, सायकल व इलेक्ट्रीक बाईक असा एकूण २ लाख १६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींसह मुद्देमाल चांदुररेल्वे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.