पोषण आहाराचे बारा मेन्यूने शिक्षकांचे वाढले हार्टबीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:23 AM2024-09-19T11:23:04+5:302024-09-19T11:24:10+5:30
साहित्याचा नाही पत्ता : हिशेब ठेवणार तरी कोण ?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने १२ मेन्यूचे प्रकार ठरवून दिलेले आहेत. प्रत्येक दिवशीचे मेन्यू कार्ड शिक्षक, मुख्याध्यापकांना दिले आहे. मुलांना पोषण आहार मिळत असला तरी १२ मेन्यू शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
विद्यार्थ्यांना पोषण आहारात नियमित खिचडी दिली जात असल्यामुळे आता आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ यांचा हिशेब ठेवावा लागणार आहे. तो कसा ठेवावा, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांनी सांगितले. शासनाने शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्याची मागणी आहे.
अशा आहेत अडचणी
नाचणीसत्व, दूध पावडर, साखर, गूळ, सोयाबीन वडी, कांदा, लसूण, तेल, जिरे, कडधान्य आदी साहित्याचा पुरवठा झालेला नाही. दिवसभरातून तीन वेळा मुलांना नाचणी सत्व, तांदळाची खीर, पुलाव, मोड आलेले कडधान्य द्यावे लागेल. नाचणी सत्व हे अन्नधान्य महामंडळाकडून पुरविले येणार आहे.
या आहेत पाककृती ?
पोषण आहारात भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळीची खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण- भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य आदी पदार्थांचा समावेश आहे.
"कोणतेही साहित्य न देताच नवीन पाककृती करण्याचे आदेश दिले आहे. यातील अनेक पदार्थ न टिकणारे आहेत. शाळेमध्ये वस्तू ठेवण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शिक्षकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी."
- राजेश सावरकर, शिक्षक