आपत्ती व्यवस्थापनाचे दरवर्षी वाजतात बारा

By Admin | Published: June 14, 2015 12:20 AM2015-06-14T00:20:58+5:302015-06-14T00:20:58+5:30

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी प्रशासन नियोजन करते. मात्र, प्रत्येकवेळी या नियोजनाचे तीनतेरा वाजलेले दिसतात़

Twelve o'clock every month of disaster management | आपत्ती व्यवस्थापनाचे दरवर्षी वाजतात बारा

आपत्ती व्यवस्थापनाचे दरवर्षी वाजतात बारा

googlenewsNext

साडेतीन हजार घरे प्रभावीत : दहा वर्षांत २७ जणांचा मृत्यू
धामणगाव रेल्वे : पावसाळ्यापूर्वी दरवर्षी प्रशासन नियोजन करते. मात्र, प्रत्येकवेळी या नियोजनाचे तीनतेरा वाजलेले दिसतात़ काही वेळा तर अपुऱ्या सामग्रीमुळे या नियोजनाचा पूरता फज्जा उडतो. यावर्षीसुध्दा आपत्ती व्यवस्थापनाचे बारा वाजले असल्याचे स्पष्ट चित्र पुढे आले आहे. मागील दहा वर्षांत झालेल्या पावसाळ्यात साडेतीन हजार घरे प्रभावीत झालीत. २७ जणांचा बळी व १४० जनावरे दगावली़
धामणगाव तालुक्याची भौगोलिक स्थितीत चंद्रभागा, विदर्भ, मोतीकोळसा, खोलाड, लोंडी, घोराड, या नद्यांचा समावेश आहे़ तब्बल २५ गावे दरवर्षी लहान मोठ्या आलेल्या पावसाने प्रभावीत होतात़ वर्धा- देवगाव हा सुपर एक्सप्रेस हायवे प्रत्येक पावसाळ्यात बंद होतो़ तालुक्यात दरवर्षी पुराची समस्या उदभवते़ निंभोरा राज, कळाशी, सोनेगाव खर्डा, आजनगाव, भिल्ली, नारगावंडी, दत्तापूर या गावाला पुराचा फटका बसतो़ थोडा जरी पाऊस झाला तरी अनेक गावांत पुराचे पाणी शिरते. दरवर्षी नालासफाईचे काम युध्दस्तरावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी होत असले तरी कागदोपत्री झालेल्या या कामाचा फटका अनेक गावांना बसतो़
पुराचा सामना करण्यासाठी दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते़ मात्र आयत्यावेळी याचा काही उपयोग होत नाही़ पावसाळ्यात आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडून जाते़ दरवर्षी केलेले नियोजन प्रत्येकवेळी कागदावरच राहत असल्याने नियोजनाचा फज्जा उडाला़ यंदाही पावसाळ्याला सुरुवात झाली असून दमदार पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

महावितरणचा लपंडाव
दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक गावांना महावितरणाचा फटका बसतो. थोडा पाऊस झाला तरी मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी, तळेगाव दशासर, जुना धामणगाव या मोठ्या गावांसह परिसरातील वीज चार ते चाप तास पूर्णपणे बंद राहते़ मागील अनेक वर्षीपासून तुटलेले ताऱ गंजलेले खांब, व वाढणारा विद्युत दाब यामुळे हे प्रकार घडत आहे. वीज कंपनीने या पावसाळ्यात तरी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवाशी खेळणे बंद करावे, असे नागरिकांनी म्हटले आहे.

प्रत्यक्ष कामाची गरज
आपत्ती व्यवस्थापनमध्ये तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, पोलीस पाटील, यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. परंतु प्रशासकीय कर्मचारी पावसाळ्यातही आपल्या मुख्यालयी उपस्थित नसल्याने अनेकांना मूलभूत सोयी त्यावेळी मिळत नाही़ मुख्यालयी उपस्थित राहण्यासाठी दरवर्षी प्रशासकीय यंत्रनेच्यावतीने संबंधित कर्मचाऱ्यांना पत्रव्यवहार केला जात असला तरी या पत्रांना अनेक कर्मचारी केराची टोपली दाखवीत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत़

ग्रामीण भागात वाढते आजाराचे प्रमाण
उन्हाळ्यात घराशेजारी असलेले शेणखते गावाबाहेर आपल्या शेतात टाकणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे शेणखताचे ढिगारे पावसाळ्यातही अनेकांच्या घरासमोर पहावयास मिळते़ पावसाचे पाणी या ढिगाऱ्यात शिरल्यानंतर दुर्गंधी व डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. पावसाळ्यात चिकनगुनीया या रोगाने तालुक्यात थैमान घालून चार लोकांचा बळी घेतला होता़ ग्रामीण भागात या बाबीमुळे आजाराचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे दिसत आहे़

Web Title: Twelve o'clock every month of disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.