मेळघाटातील बारा गावांचा संपर्क तुटणार

By admin | Published: June 1, 2017 12:16 AM2017-06-01T00:16:35+5:302017-06-01T00:16:35+5:30

मान्सूनपूर्वी मेळघाटातील रस्ते व सुविधांचा आढावा नवसंजीवनी बैठकीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

Twelve villages in Melghat will be broken | मेळघाटातील बारा गावांचा संपर्क तुटणार

मेळघाटातील बारा गावांचा संपर्क तुटणार

Next

प्रशासनाचे दुर्लक्ष : हतरू ते कारंजखेडा रस्ता वाऱ्यावर, देखभाल कोण करणार ?
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मान्सूनपूर्वी मेळघाटातील रस्ते व सुविधांचा आढावा नवसंजीवनी बैठकीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. मात्र, तालुक्यातील कारंजखेडा ते हतरूचा रस्ता पूर्णत: नादुरुस्त असल्याने वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मेळघाटातील तब्बल बारा आदिवासी खेड्यांतील हजारो आदिवासींचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे हा रस्ता कुठल्या विभागाकडेच नसल्याने पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती केव्हा होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. २२ खेड्यांत स्वातंत्र्यानंतरसुद्धा वीजपुरवठा पोहचला नाही. तर रस्त्याअभावी कुपोषित बालकांसह रुग्णांना रस्त्यातच जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुन्हा सात दिवसांनी सुरू होणाऱ्या मान्सूनच्या धो-धो कोसळणाऱ्या सरींमुळे बारा गावांचा संपर्क तुटणार आहे. याच मार्गानी सुमिता गावानजीकचा पूल पुर्णत: नादुरुस्त असल्यामुळे तो पहिल्याच पावसात वाहून जाण्याची भीती नागरिकांनी वर्तविली आहे.

ही आहेत १२ गावे
कांजरखेडा ते हतरुचे अंतर सहा किलोमीटर आहे. हतरु येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर हा रस्ता पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. परिणामी हतरू आणि पलिकडे असलेल्या सिमोरी, सरोवारखेडा, बोराट्याखेडा व लगतच्या मध्यप्रदेशातील गावांचा संपर्क तुटणार आहे. याच मार्गावर दोन वर्षांपूर्वी जवळपास एक कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला पूल खचल्याने पावसात तोसुद्धा वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तर रस्ता पूर्णत: नादुरुस्त झाला आहे.

रस्ता कुणाचा, यंत्रणांचे हात वर ?
सेमाडोह, रायपूर, हतरू ते कारंजखेडा या मार्गे एकूण ४३ किलोमीटर अंतर आहे. एक वर्षापूर्वीपर्यंत जिल्हापरिषदेचे बांधकाम विभागामार्फत याची देखरेख, दुरुस्ती करण्यात येत होती. मात्र, गतवर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत हा रस्ता हस्तांतरीत करण्यात आला. जिल्हापरिषदेने या रस्त्यावर आता कुठलाच खर्च किंवा दुरुस्ती करू नये, असे पत्र मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयाने दिल्याने आता या रस्त्यांचा मालक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारंजखेडा ते हतरू रस्ता पूर्णत: नादुरुस्त झाला आहे. पावसाळ्यात किमान बारा गावांचा संपर्क तुटणार असून, सुमिता गावाचा पुलसुद्धा वाहून जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- नानकराम ठाकरे,
उपसभापती, पं.स. चिखलदरा

सेमाडोह ते रायपूर हतरू कारंजखेडा हा मुख्य रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गतवर्षी जि.प. बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करण्यात आला आहे. यावर खर्च करू नये, असे पत्र संबंधित विभागाने दिले आहे.
- मिलींद भेंडे, शाखा अभियंता,
जि.प. बांधकाम विभाग

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २६ कोटी ५० लक्ष रुपये खर्चुन सिमेंट रस्ता होणार आहे. मात्र रस्ता हस्तांतरित झाल्याचा प्रस्ताव न आल्याने तीस किलोमीटर रस्त्याच्या तीन टप्प्यांतील निविदा थांबल्या आहेत.
- अरविंद गावंडे,
उपअभियंता, पीएमजेएसवाय

Web Title: Twelve villages in Melghat will be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.