रात्रपाळीत इर्विनमधील अटेन्डंट, स्वीपर, सुरक्षा रक्षक बेपत्ता
By Admin | Published: September 19, 2016 12:25 AM2016-09-19T00:25:09+5:302016-09-19T00:25:09+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात संपूर्ण आरोग्य सेवेची धुरा सद्यस्थितीत परिचारिकांवर आली आहे.
परिचारिकांवर आरोग्य सेवेची धुरा : पालकमंत्री लक्ष देणार का?
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात संपूर्ण आरोग्य सेवेची धुरा सद्यस्थितीत परिचारिकांवर आली आहे. रात्रपाळीत अटेन्डंट, कक्षसेवक, स्वीपर व सुरक्षा रक्षक बेपत्ता असल्यामुळे परिचारिकांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. इर्विन रुग्णालयातील ही अव्यवस्था कधी सुधारणार, असा प्रश्न परिचारिकांना पडला आहे. याकडे पालकमंत्री लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्हाभरातील गोरगरीब रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य ती आरोग्य सेवा पुरविली जाते. डॉक्टर व परिचारिका रुग्णांना बरे करण्यासाठी सतत परिश्रम घेतात. मात्र, काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा व कामचुकारपणामुळे परिचारिकांवर ताण वाढविला आहे. रात्रपाळीत अटेन्डंट, कक्षसेवक, स्वीपर, सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. मात्र, महिन्याभरातून क्वचीतच हे कर्मचारी उपस्थित राहत असल्यामुळे सर्वच कामाची धुरा परिचारिकांना सांभाळावी लागत आहे. काही महिन्यांत या कर्मचाऱ्यांपैकी अन्टेंडट, स्वीपर व सुरक्षा रक्षक यांचे हजेरी पुस्तकात उपस्थित असल्याची नोंदच नाही. मात्र, तरीही महिन्याकाठी या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येते. या हजेरी पुस्तकात प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद केली जाते. ही नोंदवही दररोज जिल्हा शल्य चिकित्सकांच्या समक्ष ठेवली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यात अन्टेंडट व स्वीपर उपस्थित नसण्याबाबत सीएसकडूनसुद्धा गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येत आहे. रात्रपाळीत कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना वॉर्डात नेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकच स्वत:च रुग्णांना वॉर्डात नेताना दृष्टीस पडत आहेत. त्यातच रात्रपाळीत एकही स्वीपर हजर राहत नसल्याने काही वॉर्डांत घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. (प्रतिनिधी)
चोरट्यांचा सुळसुळाट,
सुरक्षेचा अभाव
इर्विन हे सार्वजनिक रुग्णालय असल्यामुळे तेथे अनेक नागरिक भटंकती करताना आढळून येतात. रात्रीचे अनेक टवाळखोर रुग्णालयाच्या आवारात फिरतात. रात्रीच्या वेळी वॉर्डात फिरतात, वार्डात महिला रुग्ण व परिचारिका असतात. मात्र, हे टवाळखोर रुग्णांजवळील साहित्य किंवा मोबाईल लंपास करतात. असाच प्रकार गेल्या दोन दिवसांपूर्वी घडला. एका टवाळखोर युवकाने वॉर्डात जाऊन रुग्णांचा मोबाईल चोरीला गेला, तो नातेवाईकांच्या तावडीत सापडल्याने त्याला चांगलाच चोप देण्यात आला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयामधील रुग्ण व परिचारिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
औषधींचा तुटवडा
इर्विन रुग्णालयात काही औषधींचा तुटवडा असल्याची ओरड संबंधीत कर्मचाऱ्यांकडून होत आहे. इर्विनमधील रुग्णांना लागणाऱ्या काही औषधी व गोळ्या उपलब्ध नसल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित औषधी विभागातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत औषधी व गोळ्यांचा पुरवठा करण्यात आलेला नाही.
इर्विनमध्ये प्रवर्ग ४ मधील तब्बल ६० ते ७० कर्मचारी स्थायी स्वरुपात आहेत, तर ३६ कर्मचारी कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना तीन पाळीत कर्तव्य बजावावे लागत आहे. मात्र, रात्रपाळीत कामे कमी असल्यामुळे ऐनवेळी काही कर्मचारी उपस्थितच राहत नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातून कोठूनही रात्रीचे रुग्ण दाखल होतात, मात्र, त्यांना तत्काळ आरोग्य सेवा व सुविधा मिळत नाही.