अचलपूर तालुक्यात संत्रागळतीने अडीचशे कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:13 PM2018-12-18T23:13:07+5:302018-12-18T23:13:32+5:30
निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : निसर्ग कोपल्याचा थेट फटका अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अचानक बदललेल्या तापमानामुळे संत्राझाडे वाळत आहेत. संत्र्याचीही फळगळ झाली आहे. परिणामी येथून दररोज देश-विदेशात संत्री नेणारे १०० ट्रकची संख्या रोडावून २५ ते ३० वर आली आणि त्यातून तब्बल २५० कोटी पेक्षा अधिक रकमेचा फटका बळीराजाला बसला. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वाधिक फटका संत्राउत्पादक शेतकºयांना बसला आहे. संत्र्याच्या आंबिया बहरावर देवाण-घेवाण, वर्षभराचा खर्च, कर्जफेड आदी अपेक्षा बाळगून असलेल्या संत्राउत्पादक शेतकºयांच्या नशिबी मोठी निराशा आली आहे. लाखोंची संत्री जळून जमिनीवर आल्याने मातीमोल झाली.
अचलपूर तालुक्यात ६० हून अधिक खेड्यांमध्ये संत्राउत्पादक आहेत. ११ हजार ५४० हेक्टरवर संत्राबागा आहेत. मल्हारा, गौरखेडा, धामणगाव गढी, धोतरखेडा, हनवतखेडा, मुरादपूर, एकलासपूर, शहापूर, हरम, टवलार, पथ्रोट, सालेपूर, पांढरी, सावळी आदी गावांमध्ये यंदा स्थिती विपरीत आहे.
लाखोंचा माल हजारात गेला
अचलपूर तालुक्यातील जवळपास ९० टक्के संत्राउत्पादक शेतकरी आंबिया बहर घेतात. यंदा मात्र लाखो रुपयांची संत्री महिनाभराच्या दमट तापमानाने गळाली. अचलपूर येथील संत्राउत्पादक शेतकरी सुधीर डकरे यांना अडीच लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना, त्यांना १५ हजारांत संत्री विकावी लागली. नितीन डकरे यांना सहा लाखांची संत्री ९८ हजारांत विकावा लागला. वर्षभराचा खर्च दीड लाख रुपये असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चमक येथील संजय चरोडेसह इतरही शेतकºयांची व्यथा वेगळी नाही.
गतवर्षी ३० रुपये किलो संत्री होती. यावर्षी मात्र २० ते २२ रुपये भाव मिळाला. गतवर्षी तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक संत्री विविध राज्यांसह विदेशात पाठविली होती. फळगळतीने यावर्षी फटका बसला आहे.
- राजेंद्र गोरले, संत्राउत्पादक तथा व्यापारी, अचलपूर
रायझोक्टोनिया व हायटोफोराचे आक्रमण परतवून लावण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना बोलावून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. अपुºया पावसामुळेच सर्वाधिक नुकसान झाले आहे.
प्रफुल्ल सातव
तालुका कृषी अधिकारी