जुळ्या शहरात अनेक टोळ्या सक्रिय
By admin | Published: August 29, 2015 12:37 AM2015-08-29T00:37:07+5:302015-08-29T00:37:07+5:30
रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले या युवकाची हत्या केल्यानंतर या टोळीचे तूर्त तरी पोलीस कारवाईने कंबरडे मोडले आहे.
टोळ्यांचे कंबरडे मोडा : पोलिसांनी खुफिया विभाग 'स्ट्राँग' करण्याची मागणी
अमरावती/अचलपूर : रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारुद गँगने अमित बटाऊवाले या युवकाची हत्या केल्यानंतर या टोळीचे तूर्त तरी पोलीस कारवाईने कंबरडे मोडले आहे. अशा अनेक लहान-मोठ्या टोळ्या अजूनही अचलपूर-परतवाड्यात कार्यरत आहेत. त्यांची संघटित दबंगगिरीने सामान्य माणूस त्रस्त आहे.
या टोळ्यांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांच्या मुसक्या बांधाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जुळ्या शहरात संघटित गुन्हेगारी डोके वर काढत आहे. पोलिसांच्या खुफिया विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष असते तर कदाचित अमित बटाउवालेचा जीव वाचू शकला असता. येथे अनेक लहान मोठ्या टोळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या नावाने प्रसिध्द आहेत. काहींना नावे नसून एक-दोन युवकांच्या प्रभावाखाली त्या एकत्र येतात. कुठे कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, कुस्ती, आखाडा आदी विविध खेळांच्या नावाने तर कुठे एखाद्या धर्म किंवा जातीचा संवेदनशील आधार देऊन तर कुठे एखादा अवैध व्यवसाय करुन पैसे कमावण्याच्या उद्देशाने या काही युवक एकत्र येऊन या टोळ्या तयार झाल्या असून त्यांची दबंगगिरी सुरु असते. ह्यांच्या कारस्थानाचा त्रास एखाद्या व्यक्तीला झाल्यास त्याला मारझोड करुन उलट त्याच्याचविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची, असे यांचे गुन्हेगारी जगतातील फंडे असतात. या टोळ्यांविरुध्द एखाद्याने थोडासाही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज विविध मार्गाने पध्दतशीरपणे दाबण्याचा प्रयत्न होतो. आपआपल्या पक्षांचे बळ वाढावे आपले स्थान पक्षात मजबूत रहावे, आपल्या विरोधकांना गप्प करावे यासाठी विविध पक्षाचे नेते ह्या टोळ्यांना राजाश्रय देतात. त्यात काही लोकप्रतिनिधीसुध्दा आहेत.
या टोळ्यांमधील काही जण जिममध्ये जाऊन पिळदार शरीर तयार करतात मुद्दाम आपल्या दंडाचे प्रदर्शन करुन समोरच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण कानात बाली घालतात तर कुणी दाढी आणि केस वाढवतो.
एखादा गळ्यात विशिष्ट रंगाचा दुपट्टा खांद्यावर टाकून मिरवत असतो. लोकांमध्ये दहशत निर्माण करुन आपले अवैध व्यवसाय सुरळीत सुरु रहावे हा या टोळ्यांचा उद्देश असतो यात शंका नाही.
या टोळ्या सुरुवातीला लहान असतात आपल्या दबंगगिरीवर या मोठ्या होतात तसे यांचे कारनामे वाढत जातात. मग समाजाला घातक ठरतात. या टोळ्यांना पोलिसांचीही छुपी मदत असते, हे बारुद गँगच्या प्रकरणातून उघड झाले आहे. अशा अनेक टोळ्या अचलपूर, परतवाडा शहरासह देवमाळी, कांडली, असदपूर, पथ्रोट, आसेगाव यासह आदी गावांत कार्यरत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांना जात धर्म नसतो. त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा असतो. शहरात दादागिरी करणाऱ्या टोळ्यांविरुध्द चांगल्या लोकांनी एकत्र येऊन त्यासाठी मोठे संघठन उभे करणे गरजेचे झाले आहे. अशा टोळ्यांमधील दोन-चार जणांना जरी शिक्षा झाली की सर्वजण वठणीवर येतात. त्यासाठी सज्जनांनीच आता समोर आले पाहीजे.
-सचिन देशमुख,
माजी नगराध्यक्ष
जुळ्या शहरात अशा लहान टोळी सुरुवातीला उदयाला येते. तीची त्याच वेळी पोलीसांनी माहिती घेऊन बंदोबस्त केला तर ती मोठी होत नाही. त्यासाठी पोलीसांना खुफिया विभाग स्ट्रॉंग करुन त्याची माहिती ठेवावी लागले. पण दुर्दैवाने अशाटोळ्यांना पोलीसांचीच छूपी मदत असते. काही लोकप्रतिनिधींच्या छत्रछायेतही काही गँग आहेत.
-किशोर मोहोड ,
अध्यक्ष युवक आर.पी.आय
टोळ्यांचे निर्माण होऊ द्यायच्या नसतील तर समाजधूरीणांनी समोर आले पाहीजे. रक्तदान, निर्माल्य, निर्मूलन, झाडे लावा झाडे जगवा आदी चांगली कामे काही युवक करत आहे.वाईट गोष्टींचाच उदोउदो जास्त होतो. प्रत्येक युवकात महात्मा गांधीचे विचार रुजविनेही गरजेचे आहे. सामान्यांना जुळ्या शहरात टोळ्यांचा त्रास नाही.
रवीन्द्र तोंडगावकर,
नागरिक