अमरावती विद्यापीठाच्या दोन खेळाडूंची वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी निवड, चीनमध्ये आयोजन
By गणेश वासनिक | Published: July 14, 2023 06:31 PM2023-07-14T18:31:53+5:302023-07-14T18:32:07+5:30
खेळाडूंच्या गौरवशाली कामगिरीबद्दल विद्यापीठाचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचला आहे.
अमरावती : चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समधील धनुर्विद्या क्रीडा प्रकाराकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पूर्वशा शेंडे व यशदीप भोगे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. के. आय. आय. टी. भुवनेश्वर विद्यापीठात नुकतीच अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्लीमार्फत निवड चाचणी झाली.
यात पूर्वशा व यशदीप यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, शारीरिक व क्रीडा संचालक डॉ. अविनाश असनारे, तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि अन्य सर्व प्राधिकरणाच्या सदस्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे. पूर्वशा ही अमरावती येथील श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची, तर यशदीप हा डॉ. पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. खेळाडूंच्या गौरवशाली कामगिरीबद्दल विद्यापीठाचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचला आहे.