जिल्ह्यात अडीच हजार शाळा होणार सुरू शहरात आठवी, ग्रामीणमध्ये पाचवीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:55+5:30
शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे. दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे.
धीरेंद्र चाकोलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागात पाचवीपासून, तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्याचे शासनाचे आदेश धडकताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदच व्यक्त करण्यात आला. कारण दोन वर्षांपासून ‘ढकलगाडी’ने वरच्या वर्गात जात असले तरी त्यांच्या जिवाभावाचे सोबती, वर्गमित्र यांची भेट दुरावली होती.
शहरी भागात मात्र पालक व विद्यार्थी दोघांचेही मन खट्टू झाले. कारण मुलगा अभ्यास करीत नाही, ही भुणभुण पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी शाळा सुरू न झाल्यामुळे सहन करावी लागणार आहे.
दुसरीकडे नवप्रवेशितांना यंदाही आपल्या शाळेची इमारत पाहायला मिळणार नाही. त्यांच्या हातातील मोबाईल ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून कायम राहणार असल्याने पालकांचेही टेन्शन वाढले आहे. कधी हा कोरोना जातो, असे त्यांना झाले आहे.
पालकांची संमती आवश्यक
शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केलेली नाही.
शालेय साहित्याव्यतिरिक्त केवळ मास्क, सॅनिटायझर हेच शाळेत आणण्याची परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त संक्रमणाचे साधन होऊ शकणाऱ्या वस्तू टाळण्याचे निर्देश आहेत.
शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्या दिशेने तयारी होत आहे. पालकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागात पाचवीपासून शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.
- ई. झेड. खान,
शिक्षणाधिकारी
माझा मुलगा पाचवीनंतर आता थेट सातवीत शाळेत जाईल. मध्यंतरी घरीच राहत असल्याने त्याला मजुरांअभावी शेतीची कामात कामात सोबत घ्यावे लागले. आता तो शिक्षणासाठी कष्ट घेईल. त्यासाठी शालेय साहित्यासह मास्क, सॅनिटायझर घेतले आहे.
विजय बोरकर, काजना
कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शहरी भागातदेखील पाचवीपासून शाळा सुरू व्हायला हवी होती. मुले आता ऑनलाईन क्लास आणि ट्यूशनच्या भरवशावर जेवढा होईल तेवढा अभ्यास करतात. मात्र, त्यांना कितपत समजते, हे कळणे अशक्य आहे. आता शाळा बंद राहण्यास दोन वर्षांचा कालावधी लोटला. या कालावधीत मित्र दुरावले. मोबाईलमुळे मुलांमध्ये एकांगी अवस्था आली आहे.
अजय भगत, साईनगर