अडीच हजार झाडांची होणार कापणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:02+5:30
५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण आणि गाव सोडून पुढील आणि मागील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे.
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अमरावती-परतवाडा या ब्रिटिशकालीन मार्गाचे चौपदरीकरण करण्यास एशियन डेव्हलमेंट बँक (एडीबी) ने तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर या कामात रस्त्याच्या दुतर्फा असलेली अडीच हजारांहून अधिक मोठी झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गाची दाट सावली हिरावणार आहे.
५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण आणि गाव सोडून पुढील आणि मागील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. सहाशे कोटींहून अधिक खर्च या रस्त्यावर केला जाणार आहे. यात भूसंपादनाची कुठलीही तरतूद नाही. उपलब्ध मार्गाचे उपलब्ध जागेवरच चौपदरीकरण होणार आहे. या ब्रिटिशकालीन मार्गाला १९६७ मध्ये सर्वप्रथम राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला. आता चौपरीकरणानंतर तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वेक्षण करुन विकास आराखडाही मंजूर केला तसेच हा रस्त्या एडीबीकडे वर्ग केला. भोपाळ येथील कंपनीकडून या रस्त्याचे सर्वेक्षण झाले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची, प्रस्तावाची पाहणी करून काही बदल सुचविले आहेत. महाराष्ट्र-मध्य प्रदेश असा हा आंतरराज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून नावरूपास येणार आहे.
ब्रिटिशकालीन तीन पूल
शंभर-सव्वासे वर्षांहून अधिक जुन्या या मार्गावर वलगावजवळ पेढी नदीवर, आसेगाव येथील पूर्णा नदीवर व भुगावजवळीत पिली नदीवर पूल आहे. त्यांचे अस्तित्व चौपदरीकरणात कायम राहणार आहे.
कडुनिंबाची झाडे इतिहासजमा
या मार्गावर स्त्याच्या दुतर्फा मोठी, जुनी शेकडो कडुनिंबाची झाडे आहेत. यातील काही झाडे शंभर वर्षाहून अधिक वयाची आहेत. अमरावतीहून निघाल्यानंतर परतवाड्यापर्यंत ही शेकडो कडुनिंबाची हिरवीगार झाडे प्रवाशांच्या आरोग्यासह पर्यावरणासही पोषक ठरली. पण आता या मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याने ती तोडली जाणार आहेत. यामुळे ही झाडे इतिहासजमा होणार आहेत.
या रस्त्याच्या कामात अडीच हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. पण, त्याच्या मोबदल्यात तोडल्या जाणाºया झाडांच्या तिप्पट वृक्ष मार्गाच्या दुतर्फा लावले जाणार आहेत. या रोपांचे झाडांचे संरक्षण व संवर्धन पुढील तीन वर्षे संबंधित यंत्रणेलाच करावे लागणार आहे.
-विजय वाट, उपविभगीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर