अडीच वर्षांपासून वसतिगृहात पाण्यासाठी त्राही-त्राही

By Admin | Published: June 29, 2017 12:22 AM2017-06-29T00:22:33+5:302017-06-29T00:22:33+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मागासवर्गीय वसतिगृहातील तब्बल १ हजार विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

For two and a half years in the hostels, | अडीच वर्षांपासून वसतिगृहात पाण्यासाठी त्राही-त्राही

अडीच वर्षांपासून वसतिगृहात पाण्यासाठी त्राही-त्राही

googlenewsNext

वीरेंद्र जगताप संतप्त : नांदगाव खंडेश्वरमधील प्रकार, मजीप्राचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मागासवर्गीय वसतिगृहातील तब्बल १ हजार विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अडीच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून न दिल्याने आ.वीरेंद्र जगताप यांनी बुधवारी या विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीला आ. वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, चांदूररेल्वेचे नगराध्यक्ष सिटू सूर्यवंशी, नांदगावचे नगरपंचायत अध्यक्ष अक्षय पारसकर आदी उपस्थित होते.
बैठकीत नांदगाव खंडेश्वर येथे समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गिय मुलांसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहातील पाणीसमस्येचा मुद्दा उपस्थित झाला. या वसतिगृहाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूणर्् केले आहे. त्यानंतर वसतिगृहात पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याकरिता १ नोव्हेंबर २०१४ मध्ये बांधकाम विभागाने नांदगाव नगरपंचायत हद्दीतून पाणीपुरवठ्याची पाईपलाइन टाकण्याकरिता जीवन प्राधिकरणकडे अडीच वर्षांपूर्वी ३५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या पाईपलाइनच्या निर्मितीमध्ये काही लोकांद्वारे आडकाठी आणली जात असल्याने हे काम अपूर्णावस्थेत आहे.
परिणामी वसतिगृहात राहणाऱ्या १ हजार मागासवर्गिय विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अडीच वर्षांपासून प्राधिकरणला येथील पाण्याची समस्या सोडविता येऊ नये, ही बाब अत्यंत दुर्देवी असल्याचा आरोप करीत आ. जगताप यांनी मजिप्राच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणीपुरवठ्याचे काम करताना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, असा प्रश्न जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उपस्थित केला.
पाणीपुरवठ्याच्या कामात कुणी अडचणी आणत असेल तर पोलीस संरक्षण घेवून काम करा आणि हे काम आठवडाभरात मार्गी लावा, अन्यथा गंभीर स्थिती उद्भवल्यास मजिप्राचे अधिकारी दोषी राहतील, असा दमही जिल्हाधिकाऱ्यांना याविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

या विभागांची देखील झाडाझडती
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आ. वीरेंद्र जगताप यांनी वीज वितरण कंपनी, जलसंपदा विभाग, पाणीपुरवठा विभाग, समाज कल्याण, महसूल, सहकार, ग्रामविकास, आरोग्य, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील प्रशासकीय कामकाजाची झाडाझडती घेण्यात आली. प्रशासकीय दप्तर दिरंगाईवर ताशेरे ओढत जगतापांनी याविभागातील अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुनर्वसनाचा
मुद्दाही तापला
अमरावती : याशिवाय बेंबळा प्रकल्पांंतर्गत पुनर्वसित गावठाणाकरिता पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू कराव्यात, घुईखेड, धामक, ओंकारखेडा व सावंगा बु येथे अद्यापही टँॅकरणे पाणीपुरवठा होत असून या गावांमध्ये तातडीने पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
नांदगाव तालुक्यातील धामक गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाच्या अनुषंगाने पूर्वी संपादित केलेल्या २१८ घरांचे फेरमूल्याकंन करून त्यांना सध्याच्या सीएसआरप्रमाणे मोबदला देण्याचा प्रस्ताव प्रशासनस्तरावर पडून आहे. यावर आ. जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या मुद्यावर संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. याबाबत माहिती देण्यासाठी या विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना भम्रणध्वनीवर सूचना देऊन काम त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिलेत. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत टिमटाळा गावातील दलित वस्तीमध्ये विशेष घटक योजनेतील कामे वीस वर्षांपासून झाली नसल्याने याविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला. चांदूररेल्वे येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मंजूर जागेचा त्वरीत ताबा घेऊन लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याच्या सूचना जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. याशिवाय याविषयावर आ. जगताप यांच्या विनंतीवरून आठवडाभरात जिल्हाधिकारी बैठक बोलविणार आहेत. बैठकीला विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

Web Title: For two and a half years in the hostels,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.