चार किलो गांजासह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:17+5:302021-04-26T04:12:17+5:30
सय्यद मकसूद सय्यद महेबूब (२९) रा. सुफियानगर व जमीर खान नूर खान (५०) रा. हाजी बशीरनगर अशी अटकेतील आरोपींची ...
सय्यद मकसूद सय्यद महेबूब (२९) रा. सुफियानगर व जमीर खान नूर खान (५०) रा. हाजी बशीरनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मोहम्मद इकबाल मोहम्मद एहेसान (३०, रा. चमननगर, बडनेरा) असे फरार आरोपीचे नाव आहे. मोहम्मद इकबाल याने सय्यद मकसूद व जमीर खान यांना गांजा खरेदीसाठी जयस्तंभ चौकात बोलावले. ऑटोत बसून तिघांमध्ये गांजाचा व्यवहार झाला. यावेळी मोहम्मद इकबालने सय्यद मकसूद व जमीर खान या दोघांना गांजा विक्री करून त्यांच्याजवळून पैसे घेतले. त्याचवेळी याबाबत बडनेरा पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने जयस्तंभ चौक गाठले. मात्र, पोलिसांना पाहून मोहम्मद इकबाल पळून गेला. सय्यद मकसूद व जमीर खान हे दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून ४ किलो २०० ग्रॅम गांजा, ऑटो क्रमांक एमएच २७ एएफ १९९१, दुचाकी क्रमांक एमएच २७ व्ही ६१८१ व २ मोबाइल असा एकूण १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
००००००००००००
मुलीने स्वत:च्याच घरातील साडेतीन लाखांचे दागिने पळविले
अमरावती : मुलीने आपल्या मित्राच्या मदतीने स्वत:च्याच घरातील ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचे ११९ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करून पलायन केले. ही धक्कादायक घटना रविवारी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी दागिने पळविणाऱ्या मुलीच्या आईने तक्रार दाखल केली.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेने त्यांच्याजवळील सोन्याच्या पाटल्या, गोप, बांगड्या असे एकूण ११९ ग्रॅम सोन्याचे दागिने घरातील आलमारीत सांभाळून ठेवले होते. मात्र, २४ एप्रिल रोजी त्यांना सदर दागिने ठेवलेल्या ठिकाणी दिसून आले नाही. त्यांनी घरात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला. मात्र, दागिने त्यांना मिळून आले नाहीत. अशात आपल्या मुलीनेच मित्राच्या मदतीने दागिने लंपास करून पलायन केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलगी व तिचा मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले करीत आहेत.
-----------------------
दोन अल्पवयीन चोरटे ताब्यात
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन चोरट्यांना २४ एप्रिल रोजी पहाटे हर्षराज चौकातून ताब्यात घेतले. यावेळी चोरट्यांकडून दोन चाकू व दुचाकी जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान चोरट्यांनी एका ड्रायफ्रुटच्या दुकानातील चोरीच्या गुन्ह्याची कबुलीही पोलिसांना दिली.
गाडगेनगर पोलिसांच्या पथकाला शनिवारी पहाटे हर्षराज चौकात दोन अल्पवयीन तरुण दुचाकीने संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. झडतीदरम्यान त्यांच्याजवळ दोन चाकू आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. चौकशीत हे दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर, कोतवाली व राजापेठ ठाण्यात चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. यावेळी या दोघांनी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एका ड्रायफ्रुटच्या दुकानातील चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. सदर कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले यांच्या नेतृत्वात शेखर गेडाम, सुभाष पाटील, रोशन वऱ्हाडे, नीलेश वंजारी, आस्तिक देशमुख, उमेश भोपते आदींनी केली.