विविध अपघातात दोन दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 09:58 PM2018-11-02T21:58:08+5:302018-11-02T21:58:48+5:30
वरूड मार्गावर सेेंट्रल बँक आॅफ इंडियापुढे खासगी बसच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा भीषण अपघात घडला. यानंतर संतप्त नागरिकांनी हिवरखेडनजीक वाहन गाठून त्याची तोडफोड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : वरूड मार्गावर सेेंट्रल बँक आॅफ इंडियापुढे खासगी बसच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा भीषण अपघात घडला. यानंतर संतप्त नागरिकांनी हिवरखेडनजीक वाहन गाठून त्याची तोडफोड केली.
नीलेश केशवराव बोंडे (२७, रा. खोलवाटपुरा) असे मृताचे व सागर शिवहरी बोंडे (१८) असे जखमीचे नाव आहे. नीलेशचे निंभोरा रोडवर भाजीपाल्याचे दुकान असून, तो दलालीदेखील करीत होता. तो एमएच २७ सीएफ ०२०१ क्रमांकाच्या दुचाकीने डेपो मार्गे घराकडे निघाला होता. यादरम्यान त्याचा बारावीतील पुतण्या समीर हा आर.आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाजवळून दुचाकीवर बसला. सेंट्रल बँकेपुढे अमरावतीवरून मुलताईकडे जाणाऱ्या एमपी ०५ पी ०३५४ क्रमांकाच्या खासगी बसने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे नीलेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो बसच्या चाकाखाली आला. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. समीर बोंडे याच्याही डोक्याला जखम असून, तो गंभीर जखमी आहे.
अपघातानंतर चालकाने बस पळविली. मात्र, संतप्त नागरिकांनी पाठलाग करून बस हिवरखडेनजीक बस अडविली आणि काचा फोडून संताप व्यक्त केला. चालक मोबीन अहमद अ. रशीद मन्सुरी (रा. माहुली जहागीर, मूळ रा. खानापूर, ता. मोर्शी) याला मोर्शी पोलिसांनी अटक केली. चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ अ, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मोर्शीचे ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास एएसआय नामदेव राठोड, हेडकॉन्स्टेबल कुंदन मुधोळकर करीत आहेत.
शिरजगाव कसबा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दुचाकींमध्ये शुक्रवारी सकाळी गजानन महाराज मंदिरजवळ टर्निंगवर घडली. दत्तात्रय जोशी (रा.शिरजगाव कसबा) असे मृताचे नाव आहे. ते निवृत्त बीएसएनएल अधिकारी होते. त्यांची जखमी पत्नी संजीवनी यांना परतवाडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जोशी दाम्पत्य एमएच २७ बीआर १८४३ क्रमांकाच्या दुचाकीने परतवाडाकडे जात होते. दरम्यान, सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शुभम संजय नांदुरकर (२३, रा. शिरजगाव कसबा) याच्या एमएच २७ एएक्स ११७१ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. शुभम हा परतवाडा येथे दाखल आहे. अपघाताची माहिती मिळताच शिरजगावचे ठाणेदार मुकूंद कवाडे यांनी अपघाताचा पंचनामा करून गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास शिरजगाव पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल सुने करीत आहेत.