वरुडात क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दोन सट्टेबाजांना अटक
By प्रदीप भाकरे | Published: November 2, 2022 06:16 PM2022-11-02T18:16:30+5:302022-11-02T18:19:27+5:30
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : वरूड शहरातील नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावरील ऑनलाइन सट्ट्यावर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत दोन सट्टेबाजांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख व चार मोबाइल असा ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील पथकाने १ नोव्हेंबर रोजी ही कारवाई केली.
पोलिसांनुसार, अमोल पुंडलिकराव यावले (२७, रा. जरूड) व प्रणय मुरलीधर धरमठोक (३७, रा. वरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातील क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळविला जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरूडच्या नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये दोन जण विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर मोबाइलद्वारे ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची माहिती गस्तीवरील पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पथकाने मंगळवारी त्या सट्टयावर धाड टाकली. कारवाईदरम्यान यावले व धरमठोक यांना ऑनलाइन सट्टा खेळताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरूडमध्ये जुगाऱ्यांचे हब
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार व सूरज सुसतकर, संतोष मुंदाने, दीपक सोनाळेकर, सुनील महात्मे, अमित वानखडे, शकील चव्हाण, उमेश वाकपांजर, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया व कमलेश पाचपोर आदींनी केली. वरूडमध्ये याआधीदेखील तीनदा क्रिकेट सट्टा पकडला गेला होता. त्यात चार ते सहा जणांना अटक देखील झाली होती. त्यामुळे एलसीबी येथून जाऊन तेथे कारवाई करत असताना स्थानिक वरूड पोलिसांचा क्रिकेट सटोडियांना आशीर्वाद तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.