दोन चिमुकले पुरात वाहून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 08:43 AM2018-06-28T08:43:00+5:302018-06-28T08:43:15+5:30
अमरावतीनजीकच्या बहाद्दरपूर येथील दोन चिमुकले बुधवारी पुरात वाहून गेले ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान काट आमलाजवळ घडली.
बडनेरा : अमरावतीनजीकच्या बहाद्दरपूर येथील दोन चिमुकले बुधवारी पुरात वाहून गेले ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान काट आमलाजवळ घडली. नैतिक जगदीश चवरे (६) व धनश्री जगदीश चवरे (४) अशी पुरात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आलेला होता. दोन चिमुकल्यांसह त्यांचे वडील, आजोबा दुचाकीने बहाद्दरपूरकडे निघाले होते. नाला ओलांडत असतानाच पाय घसरल्याने चिमुकले पाण्यात पडले. वडिलांनी व आजोबांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराचा वेढा तीव्र असल्याने ते हाती लागू शकले नाहीत. याची माहिती गावात व बडनेरा पोलिसांना कळताच पोलीस ताफ्यासह रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत रेस्क्यू टीमने तब्बल तीन किलोमीटरपर्यंत पाण्यात त्या मुलांचा शोध घेतला. मात्र अद्यापही ते हाती लागू शकले नाही.