दिवसा भंगाराचे काम, रात्री घरफोडीचा धंदा; दोन अट्टल चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 03:40 PM2021-11-29T15:40:09+5:302021-11-29T15:45:16+5:30
चोरट्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १२ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ४ लाख ५८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमरावती : दिवसा तीनचाकी कटल्याने शहरात फिरून भंगार साहित्य खरेदीचे काम, तर रात्री घरफोड्या करून नागरिकांच्या लाखो रुपयांच्या ऐवजावर हात साफ करणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांना गुन्हे शाखेने रविवारी जेरबंद केले. चोरट्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १२ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ४ लाख ५८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सय्यद तौसिफ सय्यद आसिफ (१९) रा. अकबरनगर व शेख जावेद ऊर्फ बबलू शेख भुरू (४५) रा. यास्मीननगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे दोघेही दिवसभर तीनचाकी कटल्याने शहरात फिरून भंगार साहित्य खरेदीचे काम करीत होते. त्यानंतर रात्री दोघेही घरफोड्या करून लाखोंच्या ऐवजावर हात साफ करीत होते.
गुन्हे शाखेचे पथक बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना शहरात अशाप्रकारचे गुन्हे करणारे दोन संशयित गुलजारनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचून सय्यद तौसिफ व शेख जावेद या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील ४, राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील २, गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील ३, खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील २ आणि बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील १ अशा १२ घरफोडीची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ४ लाख ५८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोरट्यांकडून घरफोडीच्या आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजकुमार चक्रे, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, दिनेश नांदे, मोहम्मद सुलतान, विशाल वाकपांजर, अमोल बहाद्दरपुरे, प्रशांत नेवारे, लुटे आदींनी केली.