धक्कादायक! प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दत्तक गावात दोन बालमृत्यू; ना रुग्णवाहिका, ना आरोग्य परिचारिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 10:53 PM2021-02-20T22:53:53+5:302021-02-20T22:53:53+5:30
प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी दत्तक घेतलेल्या रायपूर गावात दोन जुळी नवजात मुले डॉक्टर, आरोग्य सेविका तथा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे दगावली.
चुरणी (चिखलदरा) (अमरावती) : प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी दत्तक घेतलेल्या रायपूर गावात दोन जुळी नवजात मुले डॉक्टर, आरोग्य सेविका तथा रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे दगावली. १९ फेब्रुवारी रोजी ही घटना उघड झाली. या घटनेला चिखलदरा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून, चौकशी आरंभली आहे.
रायपूर येथील गर्भवती महिला लक्ष्मी शिवकुमार ठाकरे (२३) हिला १९ फेब्रुवारी रोजी प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. मात्र, गावात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका तथा सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उपचारास विलंब होत गेला. परिणामी एका बालकाचा जन्म घरीच झाला. मात्र, ते बाळ उदरातच दगावले होते. त्यानंतर प्रसूत महिलेला खासगी वाहनाने सेमाडोह आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे दुसऱ्या बालकाचा जन्म झाला. त्या बालकाला अमरावती येथे उपचारासाठी नेत असतानाच त्याचाही वाटेतच मृत्यू झाला. या दोन्ही बालमृत्यूला सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप गावच्या सरपंच निशा लोखंडे यांनी केला आहे.
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गायब
रायपूर गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून, त्याठिकाणी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहे. मात्र, घटनेच्या दिवशी त्यांच्यासह दोन्ही आरोग्यसेविका कर्तव्यावर नव्हत्या. एक आरोग्य सेविका अर्जित रजेवर, तर दुसरी आरोग्य सेविका प्रसूती रजेवर असल्याची माहिती सेमाडोह आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
रायपूर येथील शासकीयरुग्णवहिका अन्य कामानिमित्त इतरत्र होती. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद पाच वर्षांपासून रिक्त आहे. दोन्ही बालमृत्यूची माहिती घेतली. सोमवारी संपूर्ण चौकशीअंती संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करू. त्या महिलेची प्रसूती वेळेआधी झाली.
- डॉ. सतीश प्रधान, तालुका आरोग्य अधिकारी, चिखलदरा