दोन मुलींना वडिलांच्या संपत्तीत मिळाला वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:43+5:302021-09-26T04:14:43+5:30
मोर्शी : तालुका विधी सेवा समितीतर्फे दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता २५ सप्टेंबरला ...
मोर्शी : तालुका विधी सेवा समितीतर्फे दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता २५ सप्टेंबरला लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मुलींनी वडिलांविरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणात ६० लाखांपर्यंत संपत्तीत वाटा मिळाला. या प्रकरणात लोकअदालतीमध्ये आपसी समझोता झाला.
कोरोनाकाळात विलंब झालेल्या प्रकरणात दोन मुलींनी आपल्या वडिलांवर दावा दाखल केला होता. येथील लोकअदालतीमध्ये सदर प्रकरण २५ सप्टेंबरला ठेवण्यात आले. या प्रकरणात मोर्शी येथील रहिवासी असलेल्या वडिलांनी मुलींना प्रत्येकी ७ लाखांचे दोन धनादेश व शहरातील मुख्य व्यापार संकुलातील दोन गाळे असा अंदाजे एकूण किंमत ६० लाख रुपयांच्या संपत्तीचा वाटा देऊन आपसी समझोता करून घेतला.
लोकअदालतीचे नेतृत्व येथील न्यायाधीश एस.डी. सोनवणे, सहायक पॅनल सदस्य ॲड. भावेश ढोणे, सहायक सरकारी वकील ॲड. उज्ज्वल बारब्दे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सचिन बेले, ॲड. मंगेश केकरे, ॲड. दीपक मुळे, बार असोसिएशन सचिव ॲड. राहुल नगरकर, ॲड. पवन अकर्ते यांच्या मार्गदर्शनात प्रकरणाचा निकाल जाहीर झाला. लोकअदालतीमध्ये विविध प्रकरणात एकूण ७८ प्रकरणात ५० लाख २८ हजार ९६२ रुपये एवढ्या किमतीचे दावे निकाली काढण्यात आले. त्यापैकी बँक कर्ज प्रकरणातील दावे ४९ लाख ७३ हजार ४६२ रुपये, तर क्रिमिनल केसमध्ये रोख दंडवसुली ५५ हजार ५०० रुपये एवढी झाली आहे. या कार्यक्रमाकरिता तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी सहायक अधीक्षक शालिनी मोरे, वरिष्ठ लिपिक माया शिरभाते, वरिष्ठ लिपिक व्ही.व्ही. वाघ, वरिष्ठ लिपिक आर.व्ही. पाटील तथा कनिष्ठ लिपिक सागर सांबटकर यांनी परिश्रम घेतले.