विठ्ठल भक्तांसाठी दोन दिवस पंढरपूर स्पेशल रेल्वे; अमरावतीहून ६ व ९ जुलै रोजी धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 06:23 PM2022-06-25T18:23:35+5:302022-06-25T18:26:39+5:30
अमरावतीहून पंढरपूरकडे दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी ही गाडी सुटणार आहे.
अमरावती : गत दोन वर्षापासून ब्रेक असलेल्या अमरावती-पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडी यंदा धावणार आहे. अमरावतीहून पंढरपूरसाठी ६ व ९ जुलै तर पंढरपूर येथून परतीच्या प्रवासासाठी ७ व १० जुलै असे दोन दिवस स्पेशल रेल्वे धावणार आहे. या रेल्वे गाडीला १८ डबे असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
वारकऱ्यांचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी रेल्वे प्रशासनाने स्पेशल गाडीची व्यवस्था केली आहे. त्यानुसार या गाडीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या गाडीला एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे देण्यात आले आहे. नवी अमरावती (अकोली) येथून पंढरपूरसाठी गाडी सोडली जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने तयारी चालविली आहे. विठ्ठलभक्तांच्या दर्शनासाठीही गाडी सुरू व्हावी, यासाठी खासदार नवनीत राणा यांनी वरिष्ठ रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती. पंढरपूरकडे जाणारी गाडी क्रमांक ०१११९ तर अमरावतीकडे येणाऱ्या गाडीचा क्रमांक ०११२० असा आहे. गाडीत वातानुकूलित, आरक्षण, सामान्य असे १८ डबे जोडण्यात येणार आहे. अमरावतीहून पंढरपूरकडे दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी ही गाडी सुटणार आहे.
या स्थानकावर असेल थांबा
पंढरपूर स्पेशल रेल्वे गाडी नवी अमरावती येथून निघणार आहे. पुढे बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवाड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, अंकई, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्दुवाडी, पंढरपूर येथे थांबा देण्यात आला आहे.