दोन दिवसांत 'सहाशे कोटी'

By admin | Published: November 12, 2016 12:07 AM2016-11-12T00:07:55+5:302016-11-12T00:07:55+5:30

पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनी बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी धाव घेतली.

Two days '600 crores' | दोन दिवसांत 'सहाशे कोटी'

दोन दिवसांत 'सहाशे कोटी'

Next

पाचशे,हजारांच्या नोटा : पैसे भरण्यासाठी गर्दी
वैभव बाबरेकर अमरावती
पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नागरिकांनी बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी धाव घेतली. गुरूवार व शुक्रवार या दोनच दिवसांत जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये तब्बल ६०० कोटींची रक्कम गोळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा निर्णय जाहीर होताच नागरिकांना मोठा धक्का बसला. प्रत्येकाने स्वत: जवळील पाचशे व हजारांच्या नोटांची मोजणी सुरु केली. या नोटा बँकांमध्ये भरण्याकरिता झुंबड उडाली. मागील काही वर्षांत पाचशे व हजारांच्या नोटांचे चलन सर्वसाधारण झाले होते. मात्र, बहुतांश धनाढ्यांनी पाचशे व हजारांच्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करून ठेवल्या आहेत. त्या नोटा त्यांनी घरातच साठवून ठेवल्यामुळे आता या पैशाची नोंद आयकर विभागाकडे सद्धा नाही. हा काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशानेच पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँक खात्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाचशे व हजारांच्या नोटा बॅक खात्यात जमा करण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.
२८ लाखांवर लोकसंख्या असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात अनेकांजवळ पाचशे व हजारांच्या नोटा आहेत. त्या नोटा बँकेत भरण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरु आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, को-आॅपरेटीव्ह व खासगी अशा एकूण ३३१ बँका आहेत. मागील दोन दिवसांत याबँकांमध्ये पैसे भरण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे पाचशे व हजारांच्या नोटांचा ओढ सतत सुरु आहे. परिणामी या दोन दिवसांत तब्बल ६०० कोटींची रक्कम बँकांमध्ये जमा झाली आहे. दोन दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बँकांमध्ये पैसे जमा झाल्याची स्थिती आहे. पुढच्या काही दिवसांत हाच आकडा १ हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन दिवसांत बँकांकडे ‘फिक्स डिपॉझिट’ची संख्याही वाढली आहे.

साहेब, शंभराच्याच नोटा द्या...!
अमरावती : ‘साहेब चलनातून हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्या आहेत. मी दिवसभर काम केले असून घरी सामान घेऊन जायचे आहे. मला मजुरी देताना शंभराच्याच नोटा द्या’ अशी मागणी रोजंदारीवर काम करणारे बांधकाम मजूर मालकाकडे करू लागले आहेत. पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्यामुळे अनेकांना ‘जोर का झटका धीरे से’ लागला आहे. बांधकाम मजूर, रोजदांरीवरील कामगार, भाजीविक्रेते जुन्या नोटा घेण्यास नकार देत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर चाप लावण्यासाठी मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी हजार, पाचशेंच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या क्रांतीकारी निर्णयाचा फटका भल्याभल्यांना बसला असून दैनंदिन व्यवहार कसे करावेत, ही विवंचना सामान्यांना सतावते आहे. मात्र, मजुरांना दररोज मजुरी देताना सुटे पैसे कोठून आणावेत, असा प्रश्न संबंधितांसमोर निर्माण झाला आहे.

चार दिवसांपासून मजुरांना दैनंदिन वेतन देताना मोठी कसरत करावी लागत आहे. जुन्या चलनासाठी बँकामध्ये होणारी गर्दी ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे. तर नवीन नोटा पूर्णपणे चलनात आल्या नाहीत. मजूर जुने चलन घेत नसल्याने समस्येचा सामना करावा लागत आहे.
-प्रकाश दातार,
बांधकाम कंत्राटदार, बडनेरा.

हजार-पाचशेची नोट नको रे दादा !
अमरावती : राजकारणाशिवाय पैसा नाही आणि पैशाशिवाय राजकारण नाही, हे समीकरण ज्यांना समजले ते लक्ष्मीपूत्र झाले व त्यांनीच मतदारांना आर्थिक मदत करावी लागते, हे नवख्या राजकीय मंडळींना शिकवले. गरिबांची कामे करीत हे नेते कधी श्रीमंत झाले, हे कुणाला कळलेच नाही. लाखो रूपयांची माया जमविल्याने ते कुठे खर्च करावे, हेही समजत नाही. सध्या नगर पालिकेचा आखाडा तापू लागला आहे. खर्च केल्याशिवाय कार्यकर्ते झेंडा घेऊन फिरत नाहीत. पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने राजकीय मंडळींचे धाबे दणाणले आहेत. काय करायचे या नोटांचे असा प्रश्न पडल्याने ही मंडळी कार्यकर्त्यांना नोटा देण्याचा प्रयत्न करू लागली. पण,नेत्यांपेक्षा कार्यकर्ते हुशार असतात. पाचशे-हजारांची नोट घेण्यास ते स्पष्ट नकार देत आहेत. जिल्ह्यात नऊ नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. सगळ्याच पक्षाचे उमेदवार कार्यकर्त्यांना पाचशेच्या पुढच्याच नोटा देतात.
परंतु सध्या या नोटा चलनात नसल्याने शंभर रुपयांचे बंडल द्यावे लागणार आहे. सध्या नगर पालिकेच्या प्रचाराची लगीनघाई सुरू असली तरी मतदारांना आता खूश कसे करावे, ही मोठी विवंचना उमेदवारांना भेडसावू लागली आहे. (प्रतिनिधी)

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये
सर्वाधिक नोटा
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खातेदारांनी मोठी गर्दी केली असून या बँकांमध्ये दोन दिवसांत कोट्यवधीची रक्कम गोळा झाली आहे.सेंट्रल बँक , स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र आदी बँकांमध्ये कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात विविध३१ बँका असून पाचशे व हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी येथे गर्दी वाढली आहे. दोन दिवसांत सुमारे ६०० कोटींची रक्कम जमा झाली. नोटा बदलण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा. शनिवारपासून एटीएम सुरु होईल.
- सुनिल रामटेके, व्यवस्थापक अग्रणी बँक

Web Title: Two days '600 crores'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.