दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:15 AM2018-07-16T05:15:15+5:302018-07-16T05:15:17+5:30
सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्यात.
- गणेश वासनिक
अमरावती : सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत दोन दिवसांत २४ जणांविरूद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्यात. विशेष चौकशी पथकाने दोषींची नावे दिल्यानुसार तक्रार अधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
आदिवासी विकास विभागात २००४ ते २००९ या कालावधीत सहा हजार कोटींच्या घोटाळाप्रकरणी माजी न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील चौकशी समितीच्या शिफारशीनुसार दोषींवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठात १० जुलै रोजी नाशिक येथील बहिराम मोतीराम आणि गुलाब पवार यांच्यावतीने दाखल जनहित याचिकेवर सुनावणी झाली. १० दिवसांत दोषींवर कारवाई करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे या विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी नाशिक, ठाणे, नागपूर व अमरावती येथील अपर आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरसिंगने घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस २४ दोषींविरूद्ध पोलिसात तक्रारी देण्यात आल्या आहेत.
>यांच्याविरूद्ध तक्रार
चंद्रपूरचे माजी प्रकल्प अधिकारी अशोकुमार शुक्ला, गडचिरोलीचे बी. गिरी, भामरागड येथील मधुकर गायकवाड, देवरीचे हरिराम मडावी, अकोला माजी प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधवसह अन्य ६, किनवट येथील वाढकर व अन्य ४, औरंगाबाद येथे देशमुखसह ८ तर धारणीचे माजी पीओ रमेश मांजरीकर यांची नावे तक्रारीत असल्याचे समजते.