वझरखेडमधील पेढी नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 01:28 PM2022-08-28T13:28:29+5:302022-08-28T13:28:53+5:30
शनिवारी ६ ते ७ च्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघांचेही मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले.
अमरावती : वलगाव नजिकच्या वझरखेड येथील पेढी नदीच्या पात्रात बुडून १८ व १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद अरबाज मो. साबीर (१८) व शहबाज शहा असद शहा (१६, दोघेही रा. यास्मिननगर, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.
शनिवारी ६ ते ७ च्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघांचेही मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. मो. अरबाज व शहबाज शहा हे यास्मिननगरमधील परस्परांचे शेजारी असून, ते अन्य मित्रांसमवेत २७ ऑगस्ट रोजी वझरखेड, कुंड खुर्द, कुंड सर्जापूर येथून वाहणाऱ्या पेढी नदीच्या पात्रात पोहायला गेले होते.
या महिन्यात पेढी नदीला दोन ते तीन मोठे महापूर गेल्याने पात्र तुडूंब भरले आहे. अशातच अन्य मित्रांसमवेत ते पोहत असताना अचानक बूडू लागले. ते बुडत असल्याचे पाहून अन्य मित्रांनी आरडाओरड केली. तोपर्यंत वलगाव पोलीसही नदीपात्रावर पोहोचले. आजुबाजुच्या लोकांच्या सहकार्याने व पथकाने त्या दोघांना बाहेर काढून तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मो. साबीर व असद शहा यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली.