शिक्षकांच्या मागे दोन डझन अहवालांचा ससेमिरा
By admin | Published: January 10, 2015 12:12 AM2015-01-10T00:12:28+5:302015-01-10T00:12:28+5:30
विविध उपक्रम राबवा आणि अहवाल पाठवा या शिक्षण विभागाच्या ससेमिऱ्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या कारकून कामात भर पडणार आहे.
अमरावती : विविध उपक्रम राबवा आणि अहवाल पाठवा या शिक्षण विभागाच्या ससेमिऱ्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या कारकून कामात भर पडणार आहे. यंदा वर्षभरात तब्बल २५ नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त उपक्रम राबविण्याच्या सूचना सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग अशा प्रक्रियेनंतर मिळाल्या आहेत.
आतापर्यंत शिक्षकांना वर्षभर जवळपास १९ प्रकारचे अहवाल द्यावे लागत होते. त्यात आता भरच पडली आहे. त्यामुळे या कामांची संख्या दोन डझनांवर पोहोचली आहे. यावर्षी एका नेत्याची जयंती केली मग दुसऱ्याची का नाही, अशा वादात अडकलेल्या शासनाने नव्या वर्षी सावधगिरी बाळगत सगळ्या नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला उपक्रम राबविण्याच्या सूचना दिली आहे. जयंती, पुण्यतिथी, विशेष दिवस अशी तब्बल २५ दिवसांची यादी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांत उपक्रम राबवायचे असल्यामुळे त्यात शाळा साहजिक आहेतच. त्यामुळे आता वर्षभरातील हे २५ विशेष दिवस आणि त्याचबरोबर बांधकाम, प्रवेश सर्वशिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, माध्यान्ह भोजन, मासिक पत्रक अशी विविध अहवालांची जंत्री शिक्षकांच्या मागे लागणार आहे. त्यातच प्रत्येक शिक्षणाधिकारी आपापल्या जिल्ह्यात चांगले काम करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवितात. विभागीय स्तरावर आणि राज्यस्तरावर स्वतंत्रपणे विविध उपक्रम राबविले जातात. त्या सर्वांचे अहवाल शिक्षकांना द्यावेच लागतात. अहवालांमध्ये किती विद्यार्थी सहभागी झाले होते याची विस्तृत माहिती द्यावी लागते. त्यामुळे या वर्षात शिकवणे कमी, अहवालावर अधिक भर राहील.
असे आहेत वर्षभरातील उपक्रम
सावित्रीबाई फुले जयंती, जिजाऊ माँ साहेब जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, यशवंतराव चव्हाण जयंती, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा बसेश्वर जयंती, महाराणा प्रताप जयंती, हिंसाचार विरोधी दिन, राजर्षी शाहू महाराज जयंती, वसंतराव नाईक जयंती, लोकमान्य टिळक जयंती, शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, क्रांतीसिंह नाना पाटील जयंती, सद्भावना दिवस, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती, महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय एकात्मता दिवस, संविधान दिवस.