नापिकी व कर्जाच्या बोजाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी संपविलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 03:51 PM2023-02-06T15:51:13+5:302023-02-06T16:00:18+5:30
मोर्शी तालुक्या दोन शेतकरी आत्महत्या
मोर्शी (अमरावती) : तालुक्यात चार दिवसांमध्ये दोन शेतकऱ्यांनी कर्जाच्या बोजाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. गुरुवारी उत्तररात्री अवघ्या २४ वर्षांच्या उमद्या शेतकऱ्याने घरात गळफास घेतला, तर रविवारी ६७ वर्षीय शेतकऱ्याने ठिबकच्या नळीने शेतात गळफास घेतला.
तालुक्यातील तळणी शिवारात बाबाराव संपतराव सवाई (६७) यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मोर्शी शाखेत सुमारे सहा लाखांचे कर्ज होते. रविवारी दुपारी १२च्या सुमारास मुलगा पंकज सवाई शेतात गेला असता, त्याला वडील बाबाराव सवाई कडुनिंबाच्या झाडाला ठिबकच्या नळीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
याबाबत माहिती मोर्शी पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पंकज साबळे, नाईक विलास कोहळे, हवालदार निरंजन उकंडे अधिक तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत.
मोर्शी शहरातील सुलतानपूरस्थित श्रवण मोतीराम ठाकरे या २४ वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या घरी गुरुवारी उत्तररात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. गुरुवारी नेहमीप्रमाणे शेतातील कामे आटोपून तो थकूनभागून घरी आला. आई घरी नसल्याची संधी साधून गुरुवारी मध्यरात्री त्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. श्रवणच्या आईने शुक्रवारी सकाळी घराचे दार उघडले, तेव्हा त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
या घटनेची माहिती मिळताच, ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत श्रवण याच्याकडे अडीच एकर शेती आहे. तो या शेतीच्या भरवशावर वृद्ध आईसह उदरनिर्वाह करीत होता. पेरणीसाठी त्याने खासगी कर्ज घेतले होते. या प्रकरणी मोर्शी पाेलिसांनी नाेंद केली आहे.