दोन शेतक-यांच्या विदर्भात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:00 AM2018-02-24T04:00:31+5:302018-02-24T04:00:31+5:30
सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.
चंद्रपूर/गोंदिया : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.
वरोरा तालुक्यातील शेतकरी गजानन नामदेव निब्रड (३७) गुरुवारी शेतात जातो म्हणून निघून गेले. सकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा भाऊ राजू यांनी शोध घेतला असता, गजानन यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. गजानन यांच्यावर सोसायटीचे ९५ हजार ५१३ रुपये व ट्रॅक्टरचे ३ लाख ५५ हजार ११ रुपयांचे कर्ज होते. दुस-या घटनेत यादोराव झिंगर येल्ले (५५) या शेतकºयाने कर्जाच्या चिंतेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी गोंदिया तालुक्यात घडली.
सावकाराच्या तगाद्यामुळे एकाची आत्महत्या
नाशिक : तीन लाख रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकाराकडून होणाºया छळास कंटाळून उपनगरमधील सुनील श्रावण सूर्यवंशी (५३) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्कृती सूर्यवंशी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील सुनील यांनी संशयित अधिकारी मुरलीधर सूर्यवंशी व कल्पनाबाई खरे या दोघांकडून २०१३मध्ये तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते़ त्याच्या वसुलीसाठी चौधरी व खरे शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाणही करीत होते़ या सततच्या त्रासाला कंटाळून सुनील यांनी आत्महत्या केली.