उपोषणकर्त्यांपैकी दोघांची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:44 AM2018-12-12T01:44:37+5:302018-12-12T01:45:05+5:30
चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर अन्यायग्रस्त माजी सैनिक व शेतमजुरांनी उपोषण थाटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील बोरगाव मोहना येथील शेतजमीन मोजून आठ माजी सैनिक तसेच भूमिहीन शेतमजूर लोकांना ताबा देण्याबाबत राज्य शासनाचे निर्देश व न्यायायलयाचा निकाल २९ वर्षांपूर्वी मिळाला. त्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ६ डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर अन्यायग्रस्त माजी सैनिक व शेतमजुरांनी उपोषण थाटले आहे. एकूण दहा उपोषणकर्त्यांपैकी माजी सैनिकाची पत्नी नंदा झोड आणि भूमिहीन शेजमजूर अनिल बोदुले यांची मंगळवारी प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अन्यायग्रस्त उपोषणकर्त्यांमध्ये माजी सैनिक नारायण थोरात, अविनाश सिरसाट, बेबी जायले, संगीता सपकाळ, नंदा झोड, अनिल बोदुले, देविदास बोदुले, रामदास बोदुले, दिवाकर बोदुले आदींचा समावेश आहे. माजी सैनिक व भूमिहीन लाभार्थ्याना ताबा देण्यात यावा असे मुख्य सचिवांचे परिपत्रक असूृनही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. जमिनीचा ताबा मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
रवी राणा, बबलू देशमुख, राजेंद्र गवर्ईंची भेट
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ डिसेंबरपासून चांदूर बाजार, अचलपूर तालुक्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतमजूर अशा दहा जणांनी न्याय्य हक्कांसाठी उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई, कमलताई गवई आदींनी भेटी दिल्या.