उमरखेड येथील प्राध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी परतवाड्याच्या दोन वनरक्षकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 01:59 PM2022-08-06T13:59:49+5:302022-08-06T14:01:05+5:30
दिग्रस पोलिसांनी तब्बल ११ तास केली परतवाड्यात चौकशी
परतवाडा (अमरावती) : उमरखेड येथील प्राध्यापकाच्या खून प्रकरणात परतवाड्यातील दोन वनरक्षकांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचीही पोलिसांनी पोलीस कस्टडी घेतली आहे.
यात अटकेत असलेली त्या प्राध्यापकाची पत्नी धनश्री देशमुख (२७) ही मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत, अंजनगाव वनपरिक्षेत्रातील, पोपटखेड वर्तुळातील झिरा बीट येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. तर पोपटखेड बीटचा अतिरिक्त कार्यभारही तिच्याकडे आहे. तर अटकेतील दुसरे वनरक्षक शिवम बछले(३२) अमरावती प्रादेशिक वन विभागांतर्गत, परतवाडा वनपरिक्षेत्रातील, परतवाडा बीटमध्ये कार्यरत आहेत.
या दोघांनी मिळून वनरक्षक धनश्री देशमुख हिचा पती प्राध्यापक सचिन देशमुख याचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. दिग्रस तालुक्यातील पुसद मार्गावर सिंगद गावालगत असलेल्या नाल्यात मृतक सचिन देशमुख याचा मृतदेह पोलिसांना मंगळवारला आढळून आला आहे. या अनुषंगाने शुक्रवारला पोलिसांनी परतवाड्यात येऊन तब्बल ११ तास चौकशी केली.
अनैतिक संबंधातूनच ‘त्या’ प्राध्यापकाचा खून; पत्नीसह वनरक्षकाला घेतले ताब्यात
न झालेली जंगल गस्त
अटकेत असलेल्या धनश्रीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २९ जुलैला ती जंगलगस्तीवर होती. दरम्यान २९ जुलैला कुठलीही जंगल गस्त झाली नाही. या जंगल गस्त अनुषंगाने पोलिसांनी पोपटखेडा वर्तुळाचे वनपाल व त्या अंतर्गत असलेल्या दोन वन मजुरांकडे विचारपूस केली. त्यांनीही जंगल गस्त २९ जुलैला झाली नसल्याचे पोलिसांना सांगितले. ही जंगल गस्त २८ जुलैला झाली असून २९ जुलैला कोणीही जंगल वस्तीवर गेले नसल्याचे सूत्रांची माहिती आहे.
अटकेतील वनरक्षक शिवम बछले याने या दरम्यान स्वतःच्या अपघाताचे कारण पुढे केले. या अनुषंगाने परतवाड्यातील एका डॉक्टरांकडून घेतलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासह परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात सुट्टीचा अर्ज सादर केला. हा अर्ज ३ ऑगस्टला वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाला.
वन अधिकाऱ्यांकडे चौकशी वनरक्षक शिवम बछले यांचा सुट्टीचा अर्ज आणि त्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासण्याकरिता शुक्रवारला पोलिसांनी परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालय गाठले. तेथे उपस्थित वन अधिकाऱ्यांकडे व वनपालांकडे त्यांनी चौकशी केली. अधिक माहितीही मिळविली.
डॉक्टरांची चौकशी
वनरक्षक शिवम बछले यांच्या सुट्टीच्या अर्जाला परतवाड्यातील ज्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लागले आहे, त्यांच्याकडेही पोलिसांनी शुक्रवारला चौकशी केली. तेथील आवश्यक दस्ताऐवजांची तपासणीही केली. या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने काही प्रश्नही डॉक्टरांपुढे पोलिसांनी उपस्थित केले.
चिखलदऱ्यातही चौकशी
या अनुषंगाने चिखलदरा मार्गावर असलेल्या एका पेट्रोल पंप वरील कामगाराचीही पोलिसांनी चौकशी केली. चिखलदऱ्यात जाऊन त्यांनाही चौकशी करावी लागली.
घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी शुक्रवारला परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात चौकशी केली. विचारल्या गेलेली आवश्यक ती माहिती पोलिसांना दिल्या गेली.
प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा