दोन लाखांची रोकड पळविणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:14+5:302021-05-26T04:13:14+5:30
अमरावती : बेनोडा ठाण्याच्या हद्दीतील बेलोना येथील बेड्यावरून दोन लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली. स्थानिक ...
अमरावती : बेनोडा ठाण्याच्या हद्दीतील बेलोना येथील बेड्यावरून दोन लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व बेनोडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपींकडून १ लाख ९२ हजारांची रोकड, दुचाकी व मोबाइल असा एकूण ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
अंकुश शिवा हटकर (२१) व सुमीत भीमराव हटकर (२३, दोघेही रा. चिंचोली गवळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २४ मे रोजी बेलोना येथील बेड्यावरून एका शेळी-मेंढीपालकाची दोन लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून बेनोडा पोलिसांनी तपास आरंभला. स्थानिक गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती. बेड्यावरच राहणारा अंकुश व त्याचा साथीदार सुमीतचा यात हात असल्याचे तपासात समोर आले. या दोघांना अटक करून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ९२ हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व दोन मोबाइल असा एकूण ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटे, पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर, पोलीस उपनिरीक्षक पुपलवार, दीपक सोनाळेकर, चेतन दुबे, स्वप्निल तंवर, नीलेश डांगोरे, शशिकांत पोहरे, दिवाकर वाघमारे, राजू धुर्वे, विवेक घोरमाडे, श्रीकृष्ण मानकर आदींनी केली.
०००००००००००००००००
ऑक्सिजन सिलिंडरच्या मदतीचे ट्रक कापला
पाच आरोपींना अटक, १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : ऑक्सिजन व कमर्शियल गॅस सिलिंडरच्या मदतीने ट्रक कापणाऱ्या पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. आरोपींकडून दोन ऑक्सिजन सिलिंडर, एक कमर्शियल गॅस सिलिंडर, कटर व ट्रकचे वेगवेगळे भाग असा एकूण १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी रात्री नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील ट्रान्सपोर्टनगरात करण्यात आली.
मोहम्मद जुनेद अब्दुल जलील (३५, रा. लालखडी), हमीद खान हाफीज खान (३४, रा. हबीबनगर क्रमांक १), अब्दुल नाजीम अब्दुल नईम (२४, रा. बिस्मिल्लानगर), मोहम्मद मुश्ताक अब्दुल गणी (३५, रा. गुलिस्तानगर) व शेख सईद वल्द शेख आबीद (३६, रा. जमील कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ट्रान्सपोर्टनगर येथे ऑक्सिजन व कमर्शियल गॅस सिलिंडरच्या मदतीने ट्रक कापण्यात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने ट्रान्सपोर्टनगर गाठले. यावेळी पथकाला सदर आरोपी ट्रक कापून विविध भाग सुटे करीत असल्याचे आढळले.
आरोपींविरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेनकर, अजय मिश्रा, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, निवृत्ती काकड आदींनी केली.
००००००००००००००
दुहेरी हत्याकांडातील सहा वर्षांपासून फरार आरोपीला अटक
६ नोव्हेंबर २०१५ ची घटना, तळेगाव दशासर पोलिसांची कारवाई
अमरावती : ट्रकचालक व क्लीनरची हत्या करून सोयाबीनचे २०६ पोते लंपास करणाऱ्या एका आरोपीला तब्बल सहा वर्षांनंतर जेरबंद करण्यात तळेगाव दशासर पोलिसांना मंगळवारी यश आले. ही घटना ६ नोव्हेंबर २०१५ रोजी एका ढाब्यावर उघडकीस आली होती.
सुनील महादेव भलावी (४०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ६ नोव्हेंबर २०१५ रोजी तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव-उसळगव्हाण मार्गावरील एका ढाब्यावर ट्रकचालक व क्लीनरची हत्या करून सोयाबीनचे २०६ पोते लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास आरंभण्यात आला होता. यात पाच आरोपींची नावे समोर आली होती. त्यातील चौघांना तळेगाव दशासर पोलिसांनी अटक केली. मात्र, सुनील भलावी हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तो यवतमाळ जिल्ह्यातील नवरगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना अलीकडे मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनीलला नवरगाव येथून अटक केली. ही कारवाई तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, संतोष सांगळे, मनीष कांबळे, संदेश चव्हाण, स्वाती शेंडे आदींनी केली.