वरूडमध्ये दोन गटांचा वाद रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:15 AM2021-08-15T04:15:43+5:302021-08-15T04:15:43+5:30
वरूड : स्थानिक मुलताई चौक परिसरात १२ ऑगस्टला दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान दोन गटांच्या चकमकीत झाले आहे. ...
वरूड : स्थानिक मुलताई चौक परिसरात १२ ऑगस्टला दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान दोन गटांच्या चकमकीत झाले आहे. दोन्ही गट दोन दिवसांपासून आमनेसामने येत असल्याने तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास पुन्हा शिकलकरी मोहल्ल्यातून शेकडो लोकांचा जमाव रस्त्यावर आला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक मुलताई चौकातील नारकरे यांच्या दुकानात १२ ऑगस्टला रात्री साडेसातला उधारीच्या पैशावरून राहुल नारकरे आणि सतनामसिंग या दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी गैरकायद्याची मंडळी जमवून अश्लील शिवीगाळ व मारहाणीची घटना घडली. ३०० लोकांचा जमाव घटनास्थळी झाल्याची माहिती मिळताच वरूड पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून तणाव शांत केला. याप्रकरणी धर्मेंद्रसिंग अमरसिंग भावे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल नारकरे, तरुण शिंगरे, राज रबडे, निखिल पोकळे, संतोष उईके, मती नागदिवे व तीन जण (सर्व रा . वरूड) यांच्याविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी दोन्ही गटांची पोलीस ठाण्यात बैठक घेतली. याच वेळी आधीच्या घटनेतील आरोपीने नारकरे आणि सतनामसिंग यांच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या मुद्द्यावरून जगबीरसिंग, रघबीरसिंग व अन्य तिघांनी निखिल ओंकार पोकळे (रा. वरूड) यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. यामुळे पुन्हा वाद चिघळला. रात्री १० च्या सुमारास शिकलकरी मोहल्ल्यातून शेकडो लोकांनाच जमाव हातात काठ्या घेऊन बाहेर पडला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला. यावेळी शहरात अफवांना पेव फुटले होते.
------------------
बॉक्स