हिवरखेड, शिंदी येथून दोन पिस्टलबाजांना अटक
By प्रदीप भाकरे | Published: November 3, 2024 03:08 PM2024-11-03T15:08:57+5:302024-11-03T15:09:21+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची दोन दिवसांतील तिसरी कारवाई.
अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड व पथ्रोट पोलिसांच्या हद्दीतील शिंदी फाट्यावरून दोन पिस्टलबाजांना अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे कट्टे वजा पिस्टल व दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. १ ऑक्टोबर रोजी एलसीबीने परतवाडा येथूनदेखील देशी कटटा व जीवंत काडतुसे जप्त केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोर्शी ठाण्याच्या हद्दीत गस्त करित असतांना त्यांना आरोपी राजेश पंजाबसिंग भादा (वय ३४ वर्ष, रा. रोहना, जि. बैतुल) हा हिवरखेड येथील त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या विनापरवाना देशी बनावटी पिस्टल सदृश्य लोखंडी देशी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे २५ हजार रुपये किमतीचा देशी कट्टा मिळून आला. त्याच्याविरूध्द मोर्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तर अन्य एक कारवाई पथ्रोट पोलिसांच्या हद्दीत करण्यात अकाली. आरोपी सादिक खान साबीर खान (वय २९, रा. अजीजपुरा, अंजनगांव सुर्जी) हा देशी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्याआधारे आरोपीला शिंदी फाटयावर थांबवून त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे दिसून आली. त्याच्याविरूध्द पथ्रोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मागदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वातील पोलिस उपनिरिक्षक सागर हटवार व नितीन इंगोले, अंमलदार गजेंद्र ठाकरे, रविंद्र बावणे, पंकज फाटे, त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सै. अजमत, निलेश डांगोरे यांच्या पथकाने या दोन्ही कारवाया केल्या.