एटीएममधून निघाल्या पाचशेच्या दोन सदोष नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:26+5:30
कुणाल यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बडनेरा शाखेत खाते आहे. त्यांनी कुणाल यांना श्याम चौकातील मुख्य शाखेत संपर्क करण्यास सांगितले. कुणाल यांनी मुख्य शाखा गाठून तेथील कॅश काऊन्टरवर जाऊन नोटा दाखविल्या. तेथील कॅशियरने नोटांची पडताळणी व वरिष्ठांच्या सल्ल्यानंतर कुणाल मार्वे यांना पाचशेच्या दोन नवीन नोटा परत दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नमुना परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पाचशे रुपयांच्या सदोष नोटा निघाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. पाचशेच्या नोटांवरील दर्शनी भाग स्पष्ट, तर पृष्ठभाग अस्पष्ट असल्याचे निदर्शनास आले.
बडनेरातील नवीवस्तीत राहणारे कुणाल धनराज मार्वे हे शुक्रवारी काही कामानिमित्त अमरावती येथील बाजारपेठेत आले होते. त्यांनी नमुना स्थित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून १५०० रुपये काढले. त्यांना मिळालेल्या पाचशेच्या नोटांचे निरीक्षण केले असता, दोन नोटांची एक बाजू स्पष्ट, तर दुसरी बाजू अस्पष्ट आढळून आली. त्यांनी त्या नोटा चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र, कुणी घेत नव्हते.
कुणाल यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बडनेरा शाखेत खाते आहे. त्यांनी कुणाल यांना श्याम चौकातील मुख्य शाखेत संपर्क करण्यास सांगितले. कुणाल यांनी मुख्य शाखा गाठून तेथील कॅश काऊन्टरवर जाऊन नोटा दाखविल्या. तेथील कॅशियरने नोटांची पडताळणी व वरिष्ठांच्या सल्ल्यानंतर कुणाल मार्वे यांना पाचशेच्या दोन नवीन नोटा परत दिल्या.
अलीकडच्या काळातील सदोष मुद्रण झालेल्या नोटा प्राप्त होण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी मोर्शी शहरातील सेंट्रल बँकेतून पाचशेच्या तीन सदोष नोटा ग्राहकास प्राप्त झाल्या होत्या. त्या निदर्शनास येताच बदलून मिळाल्या होत्या.
आरबीआयकडून प्राप्त झालेले नोटांचे बंडल एटीएममध्ये टाकण्यात येते. शाई संपत असताना त्या नोटावर प्रिंटिंग झाल्याचे निदर्शनास येत आहे. खातेदाराला नवीन नोटा देण्यात आल्या आहेत.
- संजीव दुब्बा
सहायक महाप्रबंधक
एसबीआय मुख्य शाखा