२३४ नावेच कर्जमाफीच्या हिरव्या यादीत, दोन लाख शेतक-यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 07:54 PM2017-10-31T19:54:39+5:302017-10-31T19:54:56+5:30
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या १.९७ लाख शेतक-यांपैकी बहुप्रतीक्षित हिरव्या यादीत केवळ २३४ नावे मंगळवारी ‘आयटी’ विभागाने पोर्टलवर प्रसिद्ध केली. त्यामुळे यादीत नाव येणार की नाही, याबाबत शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.
- गजानन मोहोड
अमरावती - कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या १.९७ लाख शेतक-यांपैकी बहुप्रतीक्षित हिरव्या यादीत केवळ २३४ नावे मंगळवारी ‘आयटी’ विभागाने पोर्टलवर प्रसिद्ध केली. त्यामुळे यादीत नाव येणार की नाही, याबाबत शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे. टप्प्याटप्प्याने यादी प्रसिद्ध होत असल्याने तालुकास्तरावर नावांच्या पडताळणीला पुरेसा अवधी मिळत असला तरी कर्जमाफीचा घोळ निस्तरलेला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी लाभार्थींची हिरवी यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. एकाचवेळी सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू असल्याने पोर्टल कधी कधीच उघडते. १२ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १०० नावांची यादी आयटी विभागाने प्रसिद्ध केली होती. यामध्ये पडताळणीअंती ४२ नावे अमरावती जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले होते. उर्वरित अकोला जिल्ह्यातील होती. तेथील संबंधित विभागाला सहकार विभागाने कळविले होते. मंगळवारी २३४ शेतकºयांची यादी प्रसिद्ध झाली. या नावांची संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधकामार्फत पडताळणी करण्यात येत आहे. यामधून आता तालुकास्तरीय समितीची भूमिका डावलण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७९३ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते. बँकेशी पडताळणी करून यादीचे चावडी वाचन करण्यात आले व ती अपलोड करण्यात आली होती. आता ही यादी शासनाच्या आयटी विभागद्वारा प्रसिद्धी करण्यात येत आहे. साधारणपणे चार रंगात लाभार्थींच्या याद्या राहणार आहेत. यापैकी तात्पुरत्या पात्र असलेल्यांची हिरवी यादी प्रसिद्धी करण्यात येत आहे. या यादीतून दोनपेक्षा अधिक बँक खाते असलेले लाभार्थी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नोकरदार, स्थानिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या नावाची छाननी सुरू आहे.
नियमित परतफेड करणा-यांचाही समावेश
हिरव्या यादीत केवळ थकबाकीदार नव्हे, तर नियमित फेड करणाºया शेतकºयांचाही समावेश असल्याची माहिती आहे. यादी प्रसिद्धीनंतर वगळण्यात येणारी पदाधिका-यांची नावे बँकांना परस्परच कळविली जाणार आहेत. नंतर केवळ औपचारिकतेसाठी तालुका, जिल्हा व विभागीय समितीची मान्यता घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेतक-यांच्या पदरी प्रतीक्षाच
कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी रात्रंदिवस रांगा, त्यानंतर चावडी वाचन व आता हिरव्या यादीत पुन्हा नाव शोेधण्याची कसरत शेतक-यांना करावी लागत आहे. ही यादी पूर्णपणे कधी प्रसिद्ध होणार, या प्रतीक्षेत शेतकरी कुटुंबांच्या जिवाची घालमेल सुरू आहे.
जिल्ह्यातील २३४ लाभार्थींची यादी प्रसिद्ध झाली. या लाभार्थींचे अन्य बँकांतही खाते आहेत का, याची चौकशी करण्यात आली. या लाभार्थींच्या नावे नोडल बँकेद्वारा बुधवारी कर्जमाफीची रक्कम जमा होईल.
- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती