मेळघाटात दोन बिबट मृतावस्थेत आढळले; वनविभागात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 12:47 PM2022-12-07T12:47:38+5:302022-12-07T12:49:59+5:30
सेमाडोह रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना
चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह रायपूर मार्गावरील तलावाजवळ मंगळवारी सकाळी नऊ वाजता चार व दीड वर्षीय असे दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सेमाडोह परिक्षेत्रातील रायपूर मार्गावरील असेरी नामक वनखंड क्रमांक १६९ मध्ये रस्त्यापासून ५० मीटर अंतरावर व्याघ्र प्रकल्पाचा तलाव आहे. त्यानजीक बिबट बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याची तपासणी केली असता ९.३० च्या सुमारास त्या नर बिबट्याचामृत्यू झाला. तेथून काही अंतरावर दीड वर्षीय मादी बिबट देखील मृत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्या भारती, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम घटनास्थळी दाखल झाले. मृत दोन्ही बिबट्यांच्या अंगावर कुठल्याच प्रकारच्या जखमेचे निशाण नसून सर्व अवयव शाबूत असल्याचे सांगण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी वैभव हागोणे व व सी. आर. धंदर यांनी दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर तेथेच अग्निदाह करून अंत्यसंस्कार करण्यात आला. वनपाल प्रदीप बाळापुरे, पवन नाटकर, बाबुराव खैरकर, शुभम नेरकर, प्रमोद इंगळे हे तपास करीत आहेत.
तोंडातून फेस, सर्पदंशाची शक्यता?
दोन युवा बिबटे मृत आढळून आल्याने मेळघाटात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी प्रथम मृत आढळून आलेल्या बिबट्याच्या तोंडातून फेस पडत असल्याने तो खेळताना झाडावरून पडल्याची शक्यता वर्तविली जात होती. तर दुसरीकडे पाण्यात विष घातल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात असताना दोन्ही बिबट्यांचा मृत्यू सर्पदंश किंवा इतर कुठल्या तरी विषारी कारणाने झाल्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
सेमाडोहनजीक चार व दीड वर्षीय असे दोन युवा बिबटे मृतावस्थेत आढळून आले. सर्पदंश किंवा विषारी कारणाने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. जंगलात अजून तपासणी सुरू आहे.
सम्राट मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, सेमाडोह