अमरावतीत फिल्मीस्टाईल थरार... हवेत गोळीबार; बंदुकीच्या धाकावर मुलीला पळवून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 01:24 PM2022-03-08T13:24:03+5:302022-03-08T13:54:27+5:30
दुचाकीवर आलेल्या तरुणांनी लग्नसमारंभातून तरुणीला जबरदस्तीने ओढले. यावेळी नातेवाईकांनी विरोध केला असता हवेत गोळीबार करत तिला बाईकवरून पळवून नेले.
अमरावती : लग्नसमारंभाची धावपळ.. जिकते-तिकडे लगबग सगळं घर रोषणाईने सजलेलं सगळ सुरळीत सुरू असताना दोन तरुण आले व अचानक हवेत गोळीबार झाला आणि लग्नमंडपातील लोक हादरून गेले. एका प्रेमवेड्याने बंदुकीच्या धाकावर नातेवाईकांच्या डोळ्यादेखत तरुणीला जबरदस्तीने बाईकवरून पळवून नेले.
ही थरारक फिल्मीस्टाईल घटना अमरावतीतील बालाजी प्लॉट या उच्चभ्रू वस्तीत सोमवारी (दि. ७) रात्रीच्या सुमारास घडली. सदर तरुणी कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे आली होती. घरात लग्नसमारंभ असल्याने सर्वत्र तयारी सुरू होती. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन तरुण तेथे आले. त्यांनी तरुणीला समारंभातून जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नातेवाईकांनी प्रतिकार केला असता एका तरुणाने त्याच्या जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या प्रकाराने नातेवाईक हादरून गेले. नातेवाईक घाबरल्याचे पाहून त्या दोघांनी तिला जबरदस्तीने बाईकवर बसवले व नागपूरच्या दिशेने पळून गेले.
नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दुसरीकडे अपहरणकर्त्याचे आणखी दोन साथीदार नांदगावपेठ टोलनाक्यावर त्यांची वाट पाहत होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवत दोघांना पकडले असून इतर आरोपी व त्या तरुणीचा शोध सुरू आहे. या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.