एमआयडीसी उद्योजकांकडून थकीत मालमत्ताकराचे दोन कोटी वसूल
By admin | Published: January 5, 2016 12:18 AM2016-01-05T00:18:50+5:302016-01-05T00:18:50+5:30
येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तील उद्योजकांकडे गत १० वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ताकराचा गुंता सोडविण्यात ...
१० वर्षांनंतर तिढा सुटला : मार्चपर्यंत साडेचार कोटी रुपये वसुलीचे लक्ष
अमरावती : येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तील उद्योजकांकडे गत १० वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ताकराचा गुंता सोडविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. शासन स्तरावर झालेल्या निर्णयानुसार साडेसहा कोटी रुपयांतून आतापर्यंत दोन कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे.
येथील एमआयडीसीत सुमारे ५०० उद्योजक आहेत. मात्र, या उद्योजकांना महापालिका प्रशासनाने आकारलेला कर मान्य नव्हता. त्यामुळे कराची आकारणी कमी असावी, यासाठी उद्योजकांना तब्बल १० वर्षे प्रतीक्षा करावी. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या प्रयत्नाने नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. रवी राणा, आ. सुनील देशमुख, महापालिकेचे कर व मुल्य निर्धाण अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त योगेश पिठे, एमआयडीसी असोशियनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्यासमक्ष एमआयडीसी उद्योजकांंची बैठक पार पडली. याबैठकीत एमआयडीसी उद्योजकांकडे थकित असलेल्या मालमत्ता कराचा मुद्दा चर्चिला गेला. महापालिकेने दिड रुपयांप्रमाणे केलेली कर आकारणी मान्य नसल्याचा एकमुखी सूर उद्योजकांनी व्यक्त केला. ३५ पैसे प्रमाणे कर आकारणी मान्य असल्याबाबतची मागणी उद्योजकांनी रेटून धरली होती. यात शासनाच्या वतीने मनीषा म्हैसकर यांनी तोडगा काढला. अखेर कर आकारणीचे दर निश्चित करण्यात आले. एवढेच नव्हे तर मालमत्ता कर भरण्यासाठी उद्योजकांना सूट देण्यात आली. ५०० उद्योजकांकडे थकीत असलेल्या साडेसहा कोटी रुपये वसुलीचे टप्पे पाडून देण्यात आले. त्यानुसार बडनेरा झोन कार्यालयाने एमआयडीसी उद्योजकांकडे थकीत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार केला. १० वर्षांपासूनचे थकीत साडेसहा कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी वसूल केले. तीनपैकी पहिल्या टप्प्याला उद्योजकांनी प्रतिसाद दिला. मार्चपर्यंत थकीत कर वसूल होईल, असे संकेत आहेत.(प्रतिनिधी)