हरवलेल्या दोन बालिका पोलिसांच्या मदतीने पालकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:28 AM2021-09-02T04:28:15+5:302021-09-02T04:28:15+5:30
वरूड : दोन दिवसांमध्ये शहरात दोन बालिका हरवल्या होत्या. समाज माध्यमावर करण्यात आलेल्या आवाहनावरून स्थानिक नागरिकांनी दिसताक्षणीच त्यांना पोलिसांच्या ...
वरूड : दोन दिवसांमध्ये शहरात दोन बालिका हरवल्या होत्या. समाज माध्यमावर करण्यात आलेल्या आवाहनावरून स्थानिक नागरिकांनी दिसताक्षणीच त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याकरिता ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी दी ग्रेट मराठा फाउंडेशनच्या सदस्यांची मदत घेतली होती. अर्ध्या तासात ही कार्यवाही पार पडली.
अमरावतीहून आत्याकडे पाहुणी आलेली सहा वर्षीय बालिका मेन रोड परिसरात छायाचित्रकार मुकेश मारुडकर यांना रडताना दिसली. त्यांनी या मुलीला थेट पोलीस ठाण्यात नेऊन दिले. ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी दी ग्रेट मराठा फाउंडेशन अध्यक्ष नितीन गुर्जर यांना बोलावून समाज माध्यमावर या मुलीची ओळख पटविण्याचे आवाहन केले. अवघ्या अर्ध्या तासातच पालक ठाण्यात हजर झाले. पुन्हा ३० ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास पाच वर्षीय बालिका डवरगाव रस्त्यावर भटकताना नागरिकांना आढळून आली . तिला रात्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाणेदार चौगावकर यांनी एका महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्याला पाठवून शहरातील झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. मिरची प्लॉट परिसरात तिच्या पालकांचा शोध लागला. तिला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात दोन्ही बालिका सुखरूप पालकांच्या ताब्यात दिल्याने नागरिकांनी कौतुक केले.