जयस्तंभ चौकातील दोन मोबाईल शॉपी फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:55+5:30
योगेश रत्नानी (४५, रा. व्यंकटेश कॉलनी) यांचे आरके टेलिकॉम व शेजारच्या बकुल एंटरप्रायजेस या दुकानातून अनुक्रमे ८.१५ लाख व १२ लाखांचे मोबाईल व अन्य साहित्य लंपास करण्यात आले. या दुकानांचे शटर मधून फोडण्यात आले. एकाच टोळीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. ठाणेदार नीलिमा आरज यांनी पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक आयुक्त भारत गायकवाड यांनीदेखील पाहणी केली.
अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकातील दोन मोबाईल विक्रीची दुकाने फोडून तब्बल २० ते २१ लाख रुपयांचे मोबाईल संच लंपास करण्यात आले. चोरांनी महागड्या हेडफोन व ब्ल्यूटूथवरदेखील डल्ला मारला. शहर कोतवालीच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ५ ते ६ च्या सुमारास ही घटना घडली. एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरांचे चेहरे कैद झाले आहेत.
योगेश रत्नानी (४५, रा. व्यंकटेश कॉलनी) यांचे आरके टेलिकॉम व शेजारच्या बकुल एंटरप्रायजेस या दुकानातून अनुक्रमे ८.१५ लाख व १२ लाखांचे मोबाईल व अन्य साहित्य लंपास करण्यात आले. या दुकानांचे शटर मधून फोडण्यात आले. एकाच टोळीने चोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. ठाणेदार नीलिमा आरज यांनी पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक आयुक्त भारत गायकवाड यांनीदेखील पाहणी केली. योगेश रत्नानी यांना गुरुवारी सकाळी ही चोरी निदर्शनास आली. त्यांच्या दुकानातील ८.१५ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले. पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला. विशेष म्हणजे, चोरांनी त्यांच्या दुकानातील दोन ते तीन लाखांच्या मोबाईलला हात लावला नाही. दोन दुकाने सोडून असलेल्या बकुल एंटरप्रायजेसमधून १२ लाखांचे ३४ मोबाईल, १२ हजारांचे तीन हेडफोन लंपास करण्यात आले. मात्र, तेथील सीसीटीव्ही रात्री बंद होता. त्यामुळे चोर टिपले गेले नाहीत. सन २०११ मध्ये देखील बकुल एंटरप्रायजेस फोडण्यात आले होते.
दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे. चोरांच्या एकाच टोळीने चोरी केली असावी, असा प्राथमिक कयास आहे. सीसीटीव्हीमध्ये चोर कैद झाले आहेत. श्वानपथकाने पेट्रोल पंपापर्यंत त्यांचा माग काढला. सभोवतालसह अन्य ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहेत. पथके गठित करण्यात आली आहेत.
- भारत गायकवाड
सहायक पोलीस आयुक्त