‘त्या’ आंबटशौकीनांच्या दोन रात्री पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:28+5:302021-07-23T04:10:28+5:30
अमरावती : गोपालनगरच्या कैलासनगर येथील एका भाड्याच्या खोलीत ‘ कुंटणखाना’ चालविणाऱ्या दलालासह दोन ग्राहकांच्या दोन रात्री आता राजापेठ पोलिसांच्या ...
अमरावती : गोपालनगरच्या कैलासनगर येथील एका भाड्याच्या खोलीत ‘ कुंटणखाना’ चालविणाऱ्या दलालासह दोन ग्राहकांच्या दोन रात्री आता राजापेठ पोलिसांच्या कोठडीत जाणार आहेत. २२ जुलै रोजी तीनही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
राजापेठ पोलिसांनी बुधवारी गोपनीय माहितीवरून ट्रॅप यशस्वी करत दलाल विशाल पाटील (३०, रा. कैलासनगर), अब्दुल शाह छोटू शाह (२५) व साहिल शाह (२५, दोन्ही रा. हबीबनगर) यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याविरूद्ध पिटा ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाहून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन महिलांना सुधारगृहात पाठविले जाणार आहे. पैकी एका महिलेला चार महिने वयाचे अपत्य आहे. घटनेवेळी तिचेसोबत बाळ नव्हते. दरम्यान, विशाल पाटील हा या परिसरात किती दिवसांपासून हा गोरखधंदा करत होता, यात आणखी कुणी सहभागी होते का, याचा तपास पोलीस कोठडीदरम्यान केला जाणार आहे. १५ दिवसांपूर्वीच जळगाव कारागृहातून बाहेर आलेल्या विशाल पाटीलने अमरावतीत पोहोचताच भाड्याच्या खोलीला आंबटशौकीनांचा अड्डा बनविले होते.
केरळ न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ
ग्राहकांना पिटा ॲक्ट अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी का करण्यात आले, असा सवाल बचाव पक्षाकडून करण्यात आला. त्यावर पोलिसांनी आपली भूमिका न्यायालयाला पटवून देण्यासाठी केरळ उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला. त्यामुळे आरोपींना देखील पोलीस कोठडी मिळण्यास मदत झाली.