दोन कुख्यात घरफोडे अटकेत, डझनभर गुन्ह्यांचा उलगडा
By प्रदीप भाकरे | Published: July 5, 2024 04:42 PM2024-07-05T16:42:10+5:302024-07-05T16:43:22+5:30
गुन्हेशाखा युनिट - २ ची कारवाई : ७.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
अमरावती : शहर पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट दोनने दमदार कारवाई करत दोन घरफोड्यांना अटक केली. त्यांनी शहरातील तब्बल १२ गुन्हयांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून त्या घरफोडींच्या घटनेतील सुमारे ७ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हयांची उकल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुरूवारी दिली. पत्रपरिषदेला पोलीस उपायुक्त त्रयी कल्पना बारवकर, गणेश शिंदे व सागर पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे उपस्थित होते.
महबूब खान वल्द समिउल्ला खान (३१, रा. लालखडी, इमाम नगर, अमरावती) व मोहम्मद शोएब वल्द मोहम्मद शाबिर (३१, रा. नालसाबपुरा, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चोरीच्या घटनेतील एैवज आरोपींनी ज्या सुवर्णकाराला विकला होता, त्याच्याकडून तो हस्तगत करण्यात आला. त्यांच्या अटकेमुळे गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेले नऊ व नागपुरी गेट, फ्रेजरपुरा, राजापेठ व भातकुली येथील प्रत्येकी एक अशा १२ गुन्हयांचा उलगडा झाला आहे. ही कामगिरी गुन्हेशाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगोले व सत्यवान भुयारकर, उपनिरिक्षक संजय वानखडे, एएसआय राजेंद्र काळे, अंमलदार जावेद अहमद, गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चंद्रशेखर रामटेके, वेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, संदीप खंडारे यांचे पथकाने केली.
या घटनेच्या तपासात झाली उकल
स्थानिक पंचवटी कॉलनी येथील रूपेश बेलसरे हे १५ मे रोजी कुटूंबासह बाहेरगावी गेले होते. सहा दिवसानंतर ते घरी परत आले तेव्हा त्यांना चोरीची कल्पना आली. कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिणे, रोख तसेच सिसिटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण ३७ हजारांचा मुददेमाल अज्ञात चोराने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी २१ मे रोजी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली होती. त्या घटनेचा समांतर तपास करताना क्राईम टूच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली.