संजय वानखडेंच्या आत्महत्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:36 PM2017-10-26T23:36:51+5:302017-10-26T23:37:00+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी वर्धा शाखा व्यवस्थापक व एका खातेदाराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संजय वानखडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी वर्धा शाखा व्यवस्थापक व एका खातेदाराविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविला. कैलास काकडे (रा. वर्धा) याला पोलिसांनी अटक केली असून, बँक व्यवस्थापक अशोक झाडे पसार झाला आहे.
समर्थ कॉलनीतील रहिवासी संजय वानखडे यांनी त्यांचे नातेवाईक दिलीप ठाकरे यांच्या घरात महिन्याभरापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्युपूर्वी ुलिहिलेल्या चिठ्ठीत वर्धा शाखेत झालेल्या घोळाचा उल्लेख केला होता. वर्धा शाखा व्यवस्थापक व खातेदारांनी संगनमताने बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याने बँकेचे नुकसान झाले. संचालक मंडळाच्या बदनामी होईल, या विचारातून संजय वानखडे मानसिक तणावाखाली आले होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. वानखडे यांनी मृत्युपूर्वी त्यांचे बंधू प्रदीप ऊर्फ श्रीकांत वानखडे यांच्या नावे चिठ्ठी लिहून बँकेतील या सर्व घोळाबद्दलची माहिती नमूद केली होती.
वर्धा शाखेचे व्यवस्थापक अशोक झाडे आणि कैलास काकडे नामक खातेदार यांनी बँकेतील व्यवहारात केलेल्या घोळामुळेच संजय वानखडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप प्रदीप वानखडे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत केला. त्यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी अशोक झाडे व कैलास काकडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी कैलास काकडेला बुधवारी अटक केली असून, अशोक झाडे पसार झाला आहे. या कारवाईमुळे बँक अधिकारी व कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.
२९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी अटक केलेला आरोपी कैलास काकडे याला गुरुवारी न्यायालयात हजर करून चार दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयात आरोपीचे वकील प्रशांत डबरासे यांनी युक्तिवाद केला. त्यामध्ये पीसीआरची आवश्यकता नाही, आरोपी खातेदाराचा या घटनेशी संबध नाही, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कोणातेही मुद्दे नाहीत, असा युक्तिवाद डबरासे यांनी केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.