‘इर्विन’च्या एकाच वार्डातील दोन रुग्ण दगावले; रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा अरोप
By उज्वल भालेकर | Published: September 4, 2023 08:34 PM2023-09-04T20:34:46+5:302023-09-04T20:34:59+5:30
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील वार्ड क्र. ६ मध्ये भरती असलेल्या दोन रुग्णांचा सोमवारी दुपारच्या सुमारास काही वेळाच्या फरकाने मृत्यू झाला.
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील वार्ड क्र. ६ मध्ये भरती असलेल्या दोन रुग्णांचा सोमवारी दुपारच्या सुमारास काही वेळाच्या फरकाने मृत्यू झाला. याला जबाबदार रुग्णालय प्रशासन असल्याचा आरोप दोन्ही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला. त्यामुळे काही वेळेकरिता वाॅर्डामध्ये तणावाची स्थिती होती. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.
धारणी तालुक्यातील रत्नापूर येथील रहिवासी महादेव श्रीकिसन कासदेकर (२२) या युवकाला रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास काटआमला येथील एका शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला. त्याला तातडीने उपचारासाठी ‘इर्विन’मध्ये दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला वाॅर्ड क्र. ६ मध्ये भरती केले. परंतु, सोमवारी त्याचा मृत्यू झाला. रुग्ण गंभीर असतानाही त्याला आयसीयूमध्ये दाखल न करता सर्वसामान्य वार्डामध्ये का ठेवण्यात आले, असा प्रश्न नातेवाइकांनी उपस्थित केला. आसेगाव टाकरखेडा येथील संतोष नारायण कुरवाडे (६०) यांचीही रविवारी प्रकृती बिघडल्यानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. येथून या रुग्णाला इर्विन येथे रेफर करण्यात आले. हा रुग्णदेखील वार्ड क्र. ६ मध्येच भरती होता. त्याचादेखील दुपारी मृत्यू झाला. रुग्णांकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, कारवाईची मागणी केली आहे.