पोलिसांच्या दोन मारेक-यांना 24 तासांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 07:01 PM2018-05-28T19:01:37+5:302018-05-28T19:01:37+5:30
प्राणघातक हल्ला करून पोलिसाची हत्या केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आरोपींना गुन्ह्यात मदत करणा-या पाच जणांना पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.
चांदूर रेल्वे (अमरावती) : प्राणघातक हल्ला करून पोलिसाची हत्या केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आरोपींना गुन्ह्यात मदत करणा-या पाच जणांना पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी चांदूररेल्वे ठाण्याचे पोलीस अवैध दारूअड्ड्यावर धाड टाकण्यास गेले असता, आरोपींनी सतीश मडावींची हत्या करून शामराव जाधव यांना गंभीर जखमी केले.
चांदूर रेल्वेच्या मांजरखेड कसबा येथील तांडा वस्तीमागील जंगलात गावठी दारूअड्ड्यावर धाड टाकण्यास दोन पोलीस कर्मचारी गेले होते. दरम्यान आरोपींनी प्राणघातक हल्ला चढविला. या घटनेने राज्याभरातील पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी तत्काळ चांदूर रेल्वे ठाणे गाठून घटनेचा आढावा घेतला. त्यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी आरोपींना चोवीस तासांत अटक केली.
पोलिसांनी आरोपी अजय ऊर्फ राजा सकरू राठोड (२०, रा. मांजरखेड, तांडा) याला वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथून, तर आरोपी उमेश शालीकराम राठोड (४०, मांजरखेड, तांडा) याला मालखेड -अमरावती रस्त्याने पळून जाताना शिताफीने अटक केली. आरोपी उमेशची प्रकृती बिघडल्याने त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून, आरोपींना गुन्ह्यात मदत करणा-या दिनेश शालिकराम राठोड (४०), बाल्या कच्छीराम जाधव (३५), विष्णू रतनसिंग चव्हाण (३०), राजू वासुदेव राठोड (३०), सकरू लक्ष्मण राठोड (४०, सर्व रा. मांजरखेड (तांडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीजवळून गुन्ह्यात वापरलेली कु-हाड जप्त केली आहे. पुढील चौकशी पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके करीत आहे. घटनेच्या अनुषंगाने चांदूररेल्वे शहरात दोन दंगा नियंत्रण पथक, दोन गाड्या व पन्नासवर कमांडो तैनात आहेत.
चांदूरच्या इतिहासात पहिलीच घटना
पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणा-याची चांदूरच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होय. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात हजारो पोलीस दाखल झाल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. याची दखल घेत पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक एम.एस. मकानदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.
दोन्ही पोलिसांच्या मोबाईलचा सीडीआर तपासणार
चांदूर रेल्वेचे दोन्ही पोलीस गावठी अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी जात असताना त्यांनी कोणाशी संपर्क केला? हल्ला झाल्यानंतर कोणाशी संपर्क केला, याबाबतची माहिती घेण्यासाठी दोन्ही पोलिसांच्या मोबाईलचा सीडीआर तपासला जाणार आहे. पोलिसांवर हल्ला प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जखमी पोलीस शामराव जाधवची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हल्ल्याचे नेमके कारण काय, याची चौकशी करू. दोन्ही पोलिसांच्या मोबाईलचा सीडीआर तपासण्यात येईल.
- अभिनाश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती