विद्यापीठ परिसरात बिबट जोडप्यासह दोन पिलांचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:32 AM2019-09-05T01:32:02+5:302019-09-05T01:32:22+5:30
गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस्त्यांमधील कुत्र्यांची संख्या कमी केल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याची दहशत कायम आहे. येथे एकच बिबट्या नसून, जोडप्यासह दोन पिलं असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बिबट्यापासून सतर्कतेसाठी जागोजागी सूचनांचे फलक लावण्यात आले आहे, तर बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या भागात सायंकाळी ७ वाजेनंतर प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस्त्यांमधील कुत्र्यांची संख्या कमी केल्याचे वास्तव आहे. गत आठवड्यात विद्यापीठाच्या कँटीनपर्यंत कुत्र्यांच्या शिकारीसाठी त्याने येण्याची मजल गाठली आहे. तलाव परिसर, शारीरिक शिक्षण विभाग, जलतरण, क्रिकेट मैदान, रसायनशास्त्र विभाग आदी विद्यापीठाच्या पूर्वेकडील भागात बिबट्यांपासून सतर्कता ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या भागात सायंकाळी पायी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. काही मुख्य भागात बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कुलगुरू बंगला परिसरात नियमितपणे बिबट्याचे संचारक्षेत्र असल्याने या भागात अतिरिक्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे. हल्ली विद्यापीठात केवळ बिबट्याबाबत जोरदार चर्चा झडत आहेत. कँटीनपर्यंत त्याने मजल गाठल्यामुळे विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
पोलीस उपायुक्तांकडून बिबट्याच्या संचारक्षेत्राची पाहणी
विद्यापीठात बिबट्याचे वास्तव असल्याबाबत पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सोमवारी विद्यापीठ परिसर पिंजून काढला. बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या भागात सुरक्षा रक्षकांकडून बिबट्याच्या मार्गाचे अवलोकन केले. तलाव परिसराची पाहणी करताना नजीकच्या वनक्षेत्रातून बिबट्याचा मार्ग जाणून घेतला.
विद्यापीठात एकच बिबट नव्हे, तर जोडप्यासह दोन पिलं आहेत. काही दिवसांपूर्वी कुलगुरू बंगला आणि प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूला बिबट दिसून आला होता. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- मुरलीधर चांदेकर
कुलगुरू