अमरावतीत आढळलेल्या दोन रोहिंग्यांची हैद्राबादला रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:41 PM2018-08-24T16:41:04+5:302018-08-24T16:43:29+5:30
ब्रम्हदेशातील यादवीमुळे तेथून पलायन करून भारतात आश्रय घेणारे रोहिंग्या समुदायातील दोन तरुण चार दिवसांपूर्वी अमरावतीत आढळून आले.
अमरावती - ब्रम्हदेशातील यादवीमुळे तेथून पलायन करून भारतात आश्रय घेणारे रोहिंग्या समुदायातील दोन तरुण चार दिवसांपूर्वी अमरावतीत आढळून आले. त्यांना दहशतवाद विरोधी कक्षाच्या पोलिसांनी पकडून हैद्राबाद येथील शरणार्थी शिबिरात परत पाठविले. हे रोहिंगे वर्गणी गोळा करण्याच्या उद्देशाने चपराशीपु-याजवळील एका धार्मीक स्थळी आल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.
चपराशीपु-यातील धार्मीक स्थळाजवळ फिरताना आढळून आलेल्या या रोहिंग्यांची एटीसीच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली आणि त्यांच्याजवळील दस्तावेजांची तपासणी केली. त्यानंतर दोन पोलिसांसोबत दोन्ही रोेहिंग्यांना हैद्राबाद येथे पोहोचविण्यात आले. या अनुषंगाने एटीसी अधिका-यांकडे माहिती मागितली असता, त्यांनी दोघांचेही नावे देण्यास असमर्थता दर्शविली.
सनातन संस्थेशी जुळलेल्यांवर पाळत
मुंबईच्या एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथून सनातन संस्थेच्या एका पदाधिका-याच्या घरातून गावठी बॉम्ब व साहित्य जप्त केले. घातपात घडविण्याचा मोठा कट उघड झाल्यामुळे राज्यभरातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. अमरावतीमध्येही सनातन संस्थेशी जुळलेल्यांची चौकशी एटीसीने सुरू केल्याची विश्वसनीय माहिती हाती लागली आहे. सोबत हॉटेल, धार्मिक स्थळे याशिवाय संशयित प्रत्येक बारीकसारीक बाबींची तपासणी एटीसीने सुरु केली.
रोहिंगे शरणार्थी वर्गणी गोळा करण्यासाठी अमरावतीत आले होते. चौकशी व दस्तावेज तपासून त्यांना हैद्राबादला रवाना केले आहे.
- नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा.