आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना सक्तमजुरी, माहेरून पैसे आणण्याचा लावला होता तगादा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 05:16 PM2022-11-28T17:16:32+5:302022-11-28T17:18:04+5:30
अमरावती : एका विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्यापती व सासूला पाच वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड व ...
अमरावती : एका विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्यापती व सासूला पाच वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५ पी. एन. राव यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला. गजानन वसंतराव गुल्हाणे (५२) व लिलाबाई वसंत गुल्हाण (७१) दोघेही रा. हिवरखेड अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रंजना गजानन गुल्हाने असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड येथे २१ जुलै २०१५ रोजी घडली होती.
न्यायालयीन दोषारोपपत्रानुसार, गजाननचे १९९६ मध्ये रंजना यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर गजानन हा पत्नी रंजना यांना माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होता. तथा मारहाण करून त्यांचा छळ करीत होता. सासू लिलाबाईसुद्धा त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होत्या. या जाचाला कंटाळून रंजना यांनी २१ जुलै २०१५ रोजी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रंजना यांचा भाऊ राजेंद्र मधुकर बुटले (रा.मंगरूळ दस्तगीर) यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनीआरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील गजानन खिल्लारे यांनी सात साक्षीदारांची साक्ष तपासल्या. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. पी.एन. राव यांच्या न्यायालयाने आरोपी गजानन व लिलाबाई यांना शिक्षा सुनावली. पोलीस अंमलदार रिना शेलोकार यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. पोकॉ अरूण हटवार यांनी सहकार्य केले.