खदानीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; पोहणे जिवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 09:13 PM2019-10-16T21:13:33+5:302019-10-16T21:13:38+5:30
पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू झाला.
रिद्धपूर ( अमरावती) : पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. चांदूरबाजार तालुक्यातील रिद्धपूर येथे बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. क्रिश सतीश पोहोकार (१३) व सुमीत गुरु गंगाधर बाबा (१३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
रिद्धपुरातील ईएस हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणा-या क्रिश व सुमीत यांच्यासह अन्य चौघांनी बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत प्रथम सत्राचा पेपर दिला. जेवण करून दुपारी ३ च्या सुमारास ते सहा समवयस्क मित्र गावालगतच्या खदानीत पोहायला गेले. आपले दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून चौघांनी आरडाओरड केली. बाजूच्या शेतामधील काहींनी खदानीत उड्या घेतल्या. मात्र, पाणी अधिक असल्याने ते क्रिश व सुमीतला वाचवू शकले नाहीत. या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना देण्यात आली. गावकºयांच्या साहाय्याने दुपारी ४ च्या सुमारास दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. बीट जमादार तिवलकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.