त्याने केबल तोडले अन् ‘ट्रॅप’ झाला.. नागरिकांनी बेदम चोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 03:10 PM2022-01-19T15:10:14+5:302022-01-19T18:34:47+5:30
दुचाकीचे केबल तोडून ती चोरणे दोघांना चांगलेच महागात पडले. प्रत्यक्षदर्शींनी चांगलाच चोप देऊन त्यांंना राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
अमरावती : दुचाकीमालकाच्या डोळ्यादेखत त्याच्या दुचाकीचे केबल तोडून ती चोरणे दोघांना चांगलेच महागात पडले. प्रत्यक्षदर्शींनी चांगलाच चोप देऊन त्यांंना राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास गद्रे चौकातील हॉटेलसमोर घडली.
याप्रकरणी नंदकिशोर गणपतलाल बागडी (५१, रा. अंबा कॉलनी) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी पवन रमेश मुद्गल (३५, रा. शारदानगर) व नीकेश चव्हाण (३८, राजापेठ) यांच्याविरुद्ध विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे.
नंदकिशोर बागडी हे आपली (एमएच २७ एए ६३५२) ही दुचाकी हॉटेल ड्रिमलँडसमोर ठेवून ते स्टेशनरी दुकानात गेले. तेथे मित्रासोबत गप्पा करत असताना त्यांच्या दुचाकीवर एकजण बसला तर, एकजण बाजूला उभा राहिला. त्या दोघांनी ती दुचाकी थोडी सरकवत केबल तोडले. तो प्रकार बागडी व त्यांचे मित्र कारले यांच्या लक्षात आला. ती दुचाकी चोरून नेत असताना बागडी व त्यांच्या मित्राने त्या दोघांना रंगेहाथ पकडले. काहींनी त्यांना चोप देखील दिला. दरम्यान, ही माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच ते देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारणा केली असता त्यांनी स्वत:ची नावे पवन रमेश मुद्गल व व निकेश चव्हाण अशी सांगितली.
शहरात दुचाकी चोरीचे सत्र
शहरात गेल्या दोन तीन वर्षांपासून दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. सन २०२१ मध्ये देखील ३०० पेक्षा अधिक वाहने चोरीला गेली. पैकी २५ ते ३० टक्के वाहने परत मिळाली. पोलिसांनी हस्तगत केली. यंदा देखील जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सातपेक्षा अधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चोरांना आवर घालणे आव्हानात्मक आहे.
गद्रे चौकातून दुचाकी चोरताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीनंतर त्यांनी याआधी किती वाहने चोरली, याची माहिती कळू शकेल.
मनिष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ