अमरावतीत दोन हजार लीटर दूधसाठा जप्त, एफडीएची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 02:23 PM2017-10-05T14:23:45+5:302017-10-05T14:24:27+5:30
बर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अमरावती : बर्फ तयार करण्याच्या लोखंडी पत्र्याच्या डब्यामध्ये दुधाचा बर्फ करण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी दूध साठविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माहितीच्या आधारे अन्न व प्रशासन विभागाने धाड टाकून दोन लीटर दूध जप्त केलं. गुरुवारी सातुर्णामधील शिव उद्योग फॅक्टरीमध्ये ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या दुधाचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणार असल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा अधिक वापर होत असल्याने मागणी लक्षात घेता अतिरिक्त नफा कमविण्याच्या उद्देशाने विविध दूध डेअरींच्या संचालकांनी विविध पद्धतीने दुधाची साठवण करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे सातुर्णास्थित एमआयडीसीतील शिव गृहउद्योग येथे तीन दिवसांपासून दूध साठवून ठेवल्याच्या गुप्त माहितीवरून अन्न व प्रशासन विभागाच्या पथकाने धाडी टाकून दोन हजार लीटर दूध जप्त केले आहे. अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार दुधाचे नमुने तपासण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
कोजागिरीसाठी शहरात खासगी दूध डेअरींमध्ये मोठ्याप्रमाणात दुधाची साठवण करण्यात आली आहे. भेसळयुक्त व कृत्रिमरीत्या तयार केलेल्या दुधावर एफडीएची नजर असल्याचे वृत्त 'लोकमत'ने गुरूवारच्या अंकात प्रकाशित केले होते. यावर एफडीचे सह. आयुक्त सुरेश अन्नपुरे व सहाय्यक आयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे व राजेश यादव व इतर पथकाने सातुर्णा परिसरातील शिव गृहउद्योग येथे धाड टाकून अखाद्य बर्फ तयार करण्याच्या ठिकाणी दुधाची साठवण करून ठेवली होती. हा प्रकार नियमाचे उल्लंघन करणारा असून यासंदर्भात तपासणी करण्यात आली.
दोन हजार लीटर दूधसाठा याची किंमत अंदाजे १ लाख २० हजार रूपये असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. शिव गृहउद्योगचे संचालक गजेंद्र केडीया असून जप्त केलेला दूधसठा देवकी दूध डेअरी, श्रीकृष्ण दूध डेअरी, गांधी चौक, रघुवीर दूध डेअरी गांधी चौक, रूख्मिणी दूध डेअरी चपराशीपुरा, गोपालाकृष्ण दूध डेअरी अंबापेठ, राज दूध डेअरी गांधी चौक आदी डेअरींचे सदर दूध असल्याची माहिती केडिया यांनी एफडीए अधिकाºयांना दिल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे दुधाची अवैध विक्री करणाºयांचे धाबे दणाणले आहे.